ड्रेनेज समस्यांचे निदान करणाऱ्या रोबोटचे प्रात्यक्षिक
महापौर-उपमहापौरांसह अधिकाऱ्यांनी जाणून घेतली माहिती : बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार
बेळगाव : ड्रेनेज लाईनमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे निदान करणाऱ्या रोबोट मशीनचे शुक्रवारी सोलानिस कंपनीतर्फे हनुमाननगर येथे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांनी रोबोटच्या साहाय्याने बिल्डिंगमधील समस्येची पाहणी कशा पद्धतीने केली जाते याबाबत माहिती जाणून घेतली. सदर रोबोटची आवश्यकता भासल्यास सर्वसाधारण बैठकीत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे यावेळी महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी महापौर मंगेश पवार बोलताना म्हणाले, सोलानिस कंपनीने विकसित केलेला रोबोट केवळ खुल्या ड्रेनेज पाईप लाईनमधील समस्यांचे निदान करू शकतो. मात्र तुंबलेल्या ड्रेनेज पाईप लाईनमध्ये सदर रोबोट काम करू शकणार नाही. कोणत्या ठिकाणी ड्रेनेज तुंबला आहे. ड्रेनेज लाईन कोठे खराब झाली आहे. आदी प्रकारचे निदान याद्वारे केले जाऊ शकते. एका रोबोटची किमत 27 लाख रुपये असून कंपनीच्या प्रतिनिधींनी याठिकाणी आम्हाला प्रात्यक्षिक दाखविले आहे. सदर रोबोटची गरज भासल्यास किंवा हवे असल्यास महापालिकेच्या सर्व 58 नगरसेवकांना विश्वासात घेऊन सर्वसाधारण बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोबोट ड्रेनेज पाईप खराब झाल्याची माहिती देण्यासह जीपीएस लोकेशन देखील पुरवतो, असे नगरसेवक व कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.