श्रीकांत पुजारी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपतर्फे निदर्शने
कारवार : 31 वर्षापूर्वी अयोध्येतील रामजन्म भूमी आंदोलनावेळी जाळपोळीचा ठपका ठेऊन हुबळी येथील त्या रामभक्त श्रीकांत पुजारी याला अटक केलेल्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आज बुधवारी कारवार जिल्हा भाजपतर्फे येथे जोरदार निदर्शने केली. श्रीकांत पुजारीसह अन्य काही जणांवर जाळपोळीचा ठपका ठेवला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष वेंकटेश नायक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या बृहत निदर्शने आंदोलनात जिल्ह्यातील अनेक नेते व शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील सुभाष सर्कलजवळ जमा झालेल्या भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी अटक केलेल्या श्रीकांत पुजारी यांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली. राज्यातील रामभक्त व हिंदू कार्यकर्त्यांवर पोलीस खाते खोटे ठपके ठेऊन अटक करीत आहेत. असा आरोप केला. जुनी प्रकरणे उकरून काढून राज्य सरकारच कायदा व सुव्यवस्थेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे. गांधी कुटुंबियांच्याकडून शाब्बासकी मिळविण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार साधुसंतांना टार्गेट करीत आहे. हुबळी येथील श्रीकांत पुजारी यांच्यावर केलेल्या कारवाईवरून काँग्रेस सरकार हिंदू विरोधी आहे यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी वेंकटेश नायक, कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी, हल्याळचे माजी आमदार सुनील हेराडे, भाजपचे जिल्हा प्रवक्ता आणि वकील नागराज नायक, राजेंद्र नाईक आदींची समयोचित भाषणे झाली.