राक्षसी गुणअध्याय दहावा
सत्वगुणी माणसाचे गुण बघितल्यावर आपण असुरी स्वभावाच्या माणसाचे दुर्गुण पहात आहोत. त्यामध्ये मानिता, अभिमान, अतिवाद, दर्प आणि अज्ञान हे दुर्गुण आपण बघितले. अभिमान वाटणे हा असुरी संस्कृतीचा प्रमुख गुण आहे. अभिमानामुळे भांडखोर वृत्ती किंवा अतिवाद, दर्प, अज्ञान हे असुरी स्वभावाचे गुण उफाळून येतात. आपण कुणीतरी विशेष आहोत असे माणसाला वाटू लागले की, त्या विशेषत्वाचा माणसाला मोठेपणा वाटू लागतो, त्याचा त्याला अवास्तव अहंकार होतो. हा दुर्गुण साधकाच्या नाशास कारणीभूत ठरतो. माझेच म्हणणे खरे व बरोबर आहे, असा आग्रह धरून वाद करणे याला अतिवाद म्हणतात. दर्प म्हणजे उन्माद किंवा घमेंड स्वत:बद्दलच्या अवास्तव कल्पना बाळगल्याने माणूस घमेंडी होतो. परमार्थात अविवेकाला अज्ञान म्हणतात. असे लोक फारसा विचार न करता कोणत्याही थराला जाऊ शकतात. स्वत:साठी दु:खाचे डोंगर उभे करतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. असुरी स्वभावाचे लोक स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी हे सर्व करतात.
राक्षसी स्वभावाचे लोक दुराग्रही असल्याने त्याहीपुढे जाऊन संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचे काम करतात. थोडक्यात त्यासाठी ते असुरी स्वभावाच्या दुर्गुणांचा कळस गाठतात, असं म्हंटलं तरी चालेल. स्वत:चं महत्त्व वाढवण्याच्या नादात ते हळूहळू इतरांचं जेव्हढं म्हणून वाईट करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून इतरांनी त्यांना भिऊन का होईना त्यांचं मोठेपण मान्य करावं, अशी त्यांची इच्छा असते. अशा या राक्षसी स्वभावाच्या लोकांचे जन्ममृत्युच्या फेऱ्यात परिभ्रमण चालू असते असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
पृथिव्यां स्वर्गलोके च परिवृत्य वसन्ति ते ।
मद्भक्तिरहिता लोका राक्षसीं प्रकृतिं श्रिताऽ ।। 11 ।।
अर्थ- राक्षसी प्रकृतीचा आश्रय केलेले हे लोक मद्भक्तिरहित होऊन पृथ्वी आणि स्वर्गलोक यांमध्ये फेऱ्या घालीत राहतात.
विवरण- राक्षसी स्वभावाचे लोक स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात ईश्वरालासुध्दा जुमानत नाहीत. सबब त्यांनी यदाकदाचित काही पुण्यकर्म केले असल्यास त्या प्रमाणात स्वर्गसुख भोगून झाल्यावर, त्यांची रवानगी अशुभ योनीत होत राहते. इतकेच नव्हे तर त्यांच्या कुकर्माच्या प्रमाणात ते नरकयातना भोगतात. पुढे बाप्पा सांगतात की, तामसी स्वभावाचे लोक असह्य दु:ख भोगण्यासाठी कायमचे रौरव नरकात रवाना केले जातात.
तामसीं ये श्रिता राजन्यान्ति ते रौरवं ध्रुवम् । अनिर्वाच्यं च ते दु:खं भुते तत्र संस्थिताऽ ।। 12 ।।
अर्थ- हे राजा, जे तामसी प्रकृतीचा आश्रय करतात ते निरंतर रौरवाप्रत जातात. तेथे राहून ते वर्णन करण्यास अशक्य अशा प्रकारचे दु:ख भोगतात.
दैवान्निऽ सृत्य नरकाज्जायन्ते भुवि कुब्जकाऽ। जात्यन्धाऽ पङ्गवो दीना हीनजातिषु ते नृप ।। 13।।
अर्थ- हे नृपा, दैवयोगाने नरकापासून सुटले म्हणजे ते पृथिवीमध्ये कुब्ज, जात्यंध, पंगु, दीन असे उत्पन्न होतात.
विवरण- अभिमान, अतिवाद, दर्प, अज्ञान इत्यादी दुर्गुणांमुळे मनुष्य असुरी व राक्षसी स्वभावाचा बनतो. असुरी स्वभावाच्या लोकांचा कल वैयक्तिक स्वार्थ साधण्याकडे असतो तर राक्षसी स्वभावाचे लोक जुलमी, दुष्ट असतात. स्वत:पुढे ते ईश्वरालासुद्धा तुच्छ लेखतात. त्याच्याशी वैर धरतात. त्यांच्या कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात. पुढे बाप्पा म्हणतात,
पुनऽ पापसमाचारा मय्यभक्ताऽ पतन्ति ते ।
उत्पतन्ति हि मद्भक्ता यां कांचिद्योनिमाश्रिताऽ ।। 14।।
अर्थ- पुन:पुन्हा पापाचरण करणारे व माझ्या ठिकाणी भक्ति नसलेले पतन पावतात. याउलट जे माझे भक्त असतात ते कोणत्याही योनीचा आश्रय केलेले असले तरी श्रेष्ठ स्थिती पावतात.
क्रमश: