डिमॅट खाती : 17 कोटी 50 लाखांवर पोहचली
सप्टेंबरमध्ये 44 लाख नवी खाती उघडली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण डिमॅट खात्यांची संख्या 17 कोटी 50 लाख इतकी झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालात सप्टेंबरमध्ये उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे.
सदरच्या महिन्यात 44 लाख डिमॅट खाती नव्याने उघडण्यात आली आहेत. यायोगे पाहता सरासरी 40 लाख इतकी डिमॅट खाती आर्थिक वर्ष 2025 मध्ये उघडण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर महिन्याच्या स्तरावर पाहता डिमॅट खात्याच्या संख्येमध्ये 2.4 टक्के इतकी वाढ झाली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 4 कोटी 79 लाख डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत.
कुणाकडे किती खाती उघडली
यामध्ये झिरोदा यांच्या ग्राहक वर्गामध्ये 1.1 टक्का वाढ झाली आहे. त्यांच्याकडे डिमॅट उघडणाऱ्यांची संख्या 80 लाख झाली आहे. यासोबतच ग्रोव्ह यांच्या ग्राहक वर्गामध्येसुद्धा 3.1 टक्के इतकी वाढ झाली असून 1 कोटी 23 लाख इतकी त्यांची संख्या झाली आहे. एंजल वन यांच्याकडे 74 लाख खाती उघडण्यात आली आहेत. याच दरम्यान अपस्टॉक्स यांच्या ग्राहक संख्येतही वाढ झाली असून 28 लाख ग्राहकांनी त्यांच्याकडे डिमॅट खाते उघडले आहे.
कमोडिटी क्षेत्राची चमक
बीएसई बाजारातील विविध क्षेत्रांचा विचार करता कमोडिटी क्षेत्राने 26 टक्के वाढ नोंदवली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज महिन्याच्या आधारावरती 17 टक्के वाढला असून यामध्ये क्रूड ऑइल 20 टक्के, सोने 107 टक्के आणि नैसर्गिक वायू 27 टक्के इतके वाढलेले पाहायला मिळाले आहेत.