वडगाव-येळ्ळूर मार्गावर बस थांबवण्याची मागणी
परिवहन अधिकाऱ्यांची भेट : परिसरातील शेतकरी आक्रमक
बेळगाव : वडगाव-येळ्ळूर मार्गावर शेतकऱ्यांसाठी बस थांबवावी, यासाठी सोमवारी वडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी परिवहनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान परिवहनचे डीटीओ के. के. लमाणी यांनी या मार्गावर बस थांबविल्या जातील, शिवाय बस न थांबविणाऱ्या चालक-वाहकावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. वडगाव-येळ्ळूर, वडगाव, यरमाळ, धामणे या मार्गावर बस थांबवाव्यात अशी मागणी वारंवार केली जात आहे. यासाठी या मार्गावर शेतकऱ्यांनी स्वत: विनंती थांबा फलक उभारला आहे. शिवाय या मार्गावर महिलांनी बससाठी आंदोनलही छेडले आहे. मात्र परिवहनकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वडगाव-यरमाळ मार्गावर बस थांबविली जात आहे. मात्र वडगाव-येळ्ळूर मार्गावर बस थांबविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे.
सुगी हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय
सध्या भातकापणी आणि मळणी हंगामाला प्रारंभ झाला आहे. सकाळपासूनच शिवार शेतकऱ्यांनी फुलू लागले आहे. त्यामुळे शिवाराकडे ये-जा वाढली आहे. मात्र वडगाव-येळ्ळूर मार्गावर शेतकऱ्यांसाठी बस थांबविल्या जात नसल्याने गैरसोय होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना पायपीट करत घर गाठावे लागत आहे.
बस न थांबविल्याच्या तक्रारी आल्यास कारवाई
याबाबत वडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन या मार्गावर बस थांबव्यावात अशी मागणी केली. दरम्यान अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत बसचालक व वाहकांना सूचना करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय या मार्गावर बस न थांबविल्यास याबाबतची तक्रार परिवहनकडे करण्याची सूचना केली आहे. बस न थांबविल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित बसचालक-वाहकावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.