राष्ट्रीय अन्नतंत्रज्ञान संस्था बेळगावात सुरू करण्याची मागणी
खासदार शेट्टर यांनी घेतली अर्थमंत्री सीतारामन यांची भेट
बेळगाव : बेळगावमध्ये राष्ट्रीय अन्नतंत्रज्ञान संस्था (एनआयएफटीईएम) सुरू करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला असून या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी, या मागणीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. राष्ट्रीय अन्नतंत्रज्ञान संस्था सुरू झाल्यास बेळगाव परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांना उत्तम सेवा दिल्या जाणार आहेत. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांची काही दिवसांपूर्वीच शेट्टर यांनी भेट घेतली होती. बेळगाव जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी अन्नतंत्रज्ञान संस्था सुरू व्हावी, यासाठीचा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवत तो प्रस्ताव अर्थ विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यामुळे अर्थ विभागाने या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी, अशी मागणी खासदारांनी केली. अर्थमंत्री सीतारामन यांनी आपण या प्रस्तावाचा विचार करू, असे आश्वासन दिले.