जोधपूर-बेळगाव रेल्वे सुरू करण्याची मागणी
बेळगाव : हुबळी ते भगत की कोटी या मार्गावर कायमस्वरुपी रेल्वेसेवा सुरू करावी व बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली जोधपूर-बेळगाव रेल्वेसुद्धा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन मारवाडी समाजातर्फे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. के. सोमण्णा यांना देण्यात आले. बेळगाव दौऱ्यावर आल्यावेळी मारवाडी समाजाने सोमण्णा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. बरमेर ते बेळगाव या मार्गावर एकही थेट रेल्वेसेवा नाही. बेंगळूरहून बारमेरला जाण्यास अनेक पर्याय आहेत. परंतु बेळगावला एकही थेट रेल्वेसेवा नाही, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दक्षिण राजस्थान व उत्तर कर्नाटक यांना जोडण्यामध्ये रेल्वेची भूमिका महत्त्वाची ठरेल. तेव्हा याचा विचार व्हावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. रमेश भंडारी, रामेश्वर भाटी, रोहित रावत, गनुभाई ठक्कर यांनी व अन्य सदस्यांनी निवेदन दिले.