कंग्राळी बुद्रुक गावातील समस्या लक्ष्मीयात्रेपूर्वी सोडविण्याची मागणी
विकासासाठी 6 कोटी निधी मंजूर केल्याची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
वार्ताहर/कंग्राळी ब्रुद्रुक
कंग्राळी ब्रुदुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा एप्रिल 2026 मध्ये साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी गावातील रस्ते, गटारी, पाणी व इतर नागरी समस्या पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना रविवारी ग्रामपंचायत, देवस्थान पंचकमिटी, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले. ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा जवळजवळ 43 वर्षांनी भरणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. निवेदनाचा स्वीकार करून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कंग्राळी बुदुक गावासाठी मी सहा कोटी रुपये फंड मंजूर केला आहे. यात्रेपूर्वी रस्ते, गटारी, पाणी व इतर नागरी समस्या पूर्ण करून देण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवासह इतर ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंचकमिटी सदस्य, यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते
मंत्री सतीश जारकीहोळी यांनाही निवेदन
मंत्री सतीश जारकीहोळी यांनाही निवेदन देण्यात आले. कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा जवळजवळ 43 वर्षांनी म्हणजे एप्रिल 2026 मध्ये साजरी होणार असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतिश जारकीहोळी यांनाही आपल्या फंडातून जास्तीत जास्त विकास फंड मंजूर करून यात्रेपूर्वी गावच्या नागरी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याच्या आशयाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा स्वीकार करून मंत्री सतिश जारकीहोळी यांनीही गावच्या लक्ष्मीयात्रेचा विचार करून विकासासाठी अधिक विकास फंड मंजूर करून यात्रेपूर्वी नागरी समस्या सोडवू, असे आश्वासन दिले.