नरगुंदकर भावे चौकातील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी
बेळगाव : बसवाण गल्ली कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक येथील एका जुनाट पिंपळाचा वृक्ष धोकादायक बनला आहे. जमिनीपासून मुळे सुटली असून तो एका बाजूला कलंडण्याच्या स्थितीत आहे. झाडाला लागून असलेल्या एका दुकानाच्या भिंतीला तडा गेला असून सदर झाड हटविण्याबाबत वनखात्याला माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्यापही वनखात्याने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांना भितीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. शहर व उपनगरातील अनेक ठिकाणचे वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती हटविण्यात यावीत, अशी मागणी केली जात असली तरी त्याकडे वनखात्याने दुर्लक्ष केले आहे. बसवाण गल्ली कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक येथे असलेला पिंपळाचा वृक्ष एका बाजूला कलंडण्याच्या स्थितीत आहे. झाडाचा बुंधा तेथील एका दुकानाच्या भिंतीवर येऊन टेकला असल्याने भिंतीला तडा गेला आहे. सदर वृक्ष कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे याकडे वनखात्याने लक्ष घालून धोकादायक वृक्ष हटवावा, अशी मागणी केली जात आहे.