‘तो’ धोकादायक वीजखांब हलवण्याची मागणी
काही विपरित घडल्यास हेस्कॉम जबाबदार
बेळगाव : हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे आजवर अनेकांचा बळी गेला आहे. अशीच परिस्थिती सध्या फुलबाग गल्ली येथे दिसून येत आहे. घराला लागूनच विजेचा खांब असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. दुसऱ्या मजल्यावरून वीजवाहिन्यांना नकळत हात लागण्याची शक्यता असल्याने हा विजेचा खांब तात्काळ इतरत्र हलवावा, अशी मागणी होत आहे. फुलबाग गल्ली येथील एका घरालगत विजेचा खांब आहे. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमकडे अनेकवेळा हा विजेचा खांब हलवण्याची मागणी केली होती. परंतु, तो हलविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. घराच्या भिंतीला लागूनच विजेचा खांब असल्याने धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी तो खांब घरालगतच हलवण्यात आला. परंतु, केवळ एक फुटाने सरकविण्यात आल्याने धोका तसाच आहे. त्यामुळे तो इतरत्र हलविण्याची मागणी केली जात आहे. तसेच या विद्युत खांबामुळे कोणीही जखमी झाल्यास त्याची जबाबदारी हेस्कॉमची असेल, असा पवित्रा घेण्यात आला आहे.