बस्तवाड मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
बेळगाव : बस्तवाड परिसरासह ग्रामीण भागासाठी अपुऱ्या बेससेवा पुरविण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी सायंकाळी तासन्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे. तसेच एकाचवेळी 2-3 बसेस एकाच मार्गावर सोडण्यात येत असल्याने याचा फटका बसत असल्याचा आरोप प्रवाशांतून होत आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.
बस्तवाड, हलगा, कोंडुसकोप्पसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांसह विद्यार्थ्यांची शहर परिसरात ये-जा असते. मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी बसफेऱ्या वाढविण्यासाठी हलगा येथील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केले होते. पण याचाही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. बसचालक मनमानीप्रमाणे बस चालवत असून याचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे पर्यायी वाहनाने यावे लागते.
बस वेळेत सोडण्याची मागणी
बसेसचे वेळापत्रक लावले आहे. मात्र याचे पालन होत नसल्याचे अपुऱ्या बसफेऱ्यांतून दिसून येत आहे. एकाचवेळी एकाच मार्गावर दोन ते तीन बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र ज्यावेळी बसची आवश्यकता अधिक असते, त्यावेळी बस प्रवाशांनी भरून येते. यामुळे बसथांब्यांवर थांबलेल्या प्रवाशांना बसमध्ये पायदेखील ठेवता येत नाही.