गोकाक जिल्हा घोषित करण्याची मागणी
आयएनटीयुसीतर्फे शिरस्तेदार यांना निवेदन : आगामी अधिवेशनात जोरदार मोर्चा काढणार
बेळगाव : गेल्या चार दशकांपासून गोकाक जिल्ह्यासाठी विविध मोहिमेद्वारे सरकारवर दबाव आणण्यात आला. मात्र दरवेळी जिल्हा मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. गोकाक हे शैक्षणिक, भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे गोकाक जिल्ह्याचे स्वप्न भंग होत आहे. आगामी हिवाळी अधिवेशनावेळी गोकाक जिल्ह्याच्या मागणीसाठी जोरदार मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने याची दखल घेऊन गोकाक जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी आयएनटीयुसीच्यावतीने करण्यात आली. आयएनटीयुसीच्यावतीने जिल्हा मागणीसाठी गोकाक ते बेळगावपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा बुधवारी सायंकाळी बेळगाव येथे पोहोचली. गुरुवारी सकाळी पदयात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात धरणे आंदोलन केले.
अनेकवेळा आंदोलन करुनही दुर्लक्ष
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. डीजेएच पटेल हे मुख्यमंत्री असताना गोकाक जिल्हा घोषित केला होता. याबाबत त्यांनी आदेशही जारी केला होता. मात्र काही कारणांमुळे सदर आदेश रद्द करण्यात आला. जिल्हा मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने, निवेदने दिली असली तरी याकडे कानाडोळा करण्यात आला. पण राज्य सरकारने आगामी बेळगाव अधिवेशनादरम्यान गोकाक जिल्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली.