महात्मा फुले रोडवरील धोकादायक ड्रेनेज चेंबरवर झाकण घालण्याची मागणी
बेळगाव : महात्मा फुले रोड येथील दानम्मा मंदिरसमोरील ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्ती करून 15 दिवस उलटले तरीही चेंबरवर झाकण घालण्यात आलेले नाही. त्यावर केवळ झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. यामुळे यामार्गावरून रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने धोकादायक ड्रेनेज चेंबरवर झाकण घालावे, अशी मागणी केली जात आहे. शहर व उपनगरातील ड्रेनेज चेंबरची उंची वाढविण्याचे काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे चेंबरची उंची वाढविण्यासाठी खोदकाम केले जात आहे. त्याभोवती सिमेंट काँक्रीट घातले जात आहे. मात्र बहुतांश ठिकाणी खोदलेली माती तेथेच टाकली जात असून, चेंबरवर झाकणदेखील घालण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र याचा धोका ये-जा करणाऱ्या नागरिकांना निर्माण झाला आहे. नेहमी वर्दळीचा असलेल्या महात्मा फुले रोडवरील दानम्मा मंदिरसमोर ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे. पण चेंबरवर झाकण घालण्याऐवजी झाडाच्या फांद्या झाकण्यात आल्या आहेत. परिणामी रात्रीच्यावेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेने लक्ष घालून तातडीने झाकण घालण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.