शिवस्मारक चौक-रेल्वेस्टेशन रस्ता करण्याची मागणी
70 लाखाचा निधी मंजूर, रस्ता कामाचे पूजन होऊनदेखील अद्याप रस्ता करण्यात आला नाही
खानापूर : राजा छत्रपती चौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 70 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे पूजनही आमदारांच्या हस्ते झाले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे या रस्त्याचा निधी रस्त्याचे काम न करताच परस्पर लांबवला गेला आहे का, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. राजा छत्रपती चौक ते रेल्वेस्टेशन या 620 मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. या रस्त्यावर तहसीलदार, नगरपंचायत, पोस्ट ऑफीस, रेल्वेस्टेशन सर्वोदय विद्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा पंचायत आदी कार्यालये आहेत. यासह असोगा व मन्सापूर, भोसगाळी या गावांना जाणारा हा रस्ता आहे. काही वर्षापासून हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. या रस्त्याच्या विकासासाठी 70 लाखाचा निधी मंजूर झाला होता. तसेच या रस्त्याचे कंत्राटही मंजूर झाले आहे.
रस्त्याचे कामाचे पूजन गाजावाजा करून फलक लावून आमदारांच्या हस्ते केले होते. मात्र वर्षभरापासून या रस्त्याचे काम हाती घेतले नाही. सार्वजनिक बांधकाम खाते आणि कंत्राटदाराचे काही साठेलोटे झाले आहे का, या रस्त्याचा निधी अन्यत्र कोठे वळविला आहे का? की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरदहस्तामुळे निधीच लाटला आहे का, असा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. आमदारांच्या हस्ते पूजन झाल्यानंतरदेखील शहरातील मुख्य रस्त्याचे काम होऊ नये, यापेक्षा दुर्दैव कोणते, असाही प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली आहे. कंत्राट मंजूर होऊनही कंत्राटदाराकडून काम होऊ शकत नाही. तर तालुक्यातील अन्य रस्त्यांची अवस्था काय असेल, असाही प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे. तालुक्यातील अधिकारी, कंत्राटदारावर वचक नसल्याने तालुक्याला वालीच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्यांची कामेदेखील निकृष्ट दर्जाची होत असताना लोकप्रतिनिधींकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.