खानापूर शहरात स्मशानभूमी उभारण्याची मागणी
गेल्या अनेक वर्षापासून मागणीकडे दुर्लक्ष : नदीकाठावर अंत्यविधी करण्याची पूर्वापार परंपरा : पावसाळ्यात हाल
खानापूर : खानापूर शहरासाठी अद्याप स्मशानभूमी नसल्याने शहरासह उपनगरातील नागरिक अंत्यविधीसाठी मलप्रभा नदीघाटाजवळील पलीकडील बाजूच्या नदीकाठावर उघड्यावरच अंत्यविधी करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात व इतरवेळी नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. यासाठी घाटाच्या पलीकडील बाजूस बंदीस्त स्मशान उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पंचवीस-तीस वर्षापूर्वी खानापूर शहरात अंत्यविधीसाठी एकही बंदीस्त स्मशानभूमी नव्हती. यामुळे पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यविधी करणे अत्यंत अवघड जात होते. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जॅकवेलजवळील पुलाजवळ असलेल्या पूर्वीच्या नाव्हेच्या रस्त्यावर मोक्षधाम बांधले. यामुळे पावसाळ्यातील अडचण दूर झाली. पण खानापूर शहराची पूर्वापार परंपरा पाहता शहरातील नागरिक अंत्यविधी मलप्रभा नदीकाठावर करण्यात येतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना आणि नातेवाईकांना रस्त्यावरच उभे रहावे लागते.
नव्याने ब्रिजकम बंधारा उभारण्यात आल्याने अंत्यविधीसाठी जागा कमी उपलब्ध असल्याने तसेच जळगा बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आल्यानंतर ही जागाही पाण्याखाली जाते. त्यामुळे अंत्यविधीसाठी नदीकाठच्या वरील बाजूच्या जागेचा वापर करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी अनेकांची तक्रार आहे. ही पूर्वापार स्मशानभूमी असल्याने या ठिकाणी बंदीस्त शेडची उभारणी करण्यात यावी, अशी बऱ्याच वर्षाची मागणी आहे. मात्र याकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ब्रिजकम बंधाऱ्या पलीकडील सुतार कुटुंबीयांची जागा अंत्यविधीसाठी घेऊन या ठिकाणी स्मशानभूमी आणि शेड उभारण्याची योजना नगरपंचायतीकडे मांडण्यात आली आहे. तसेच सुतार कुटुंबीयांना जागा देण्यासाठी संमती दर्शविली आहे. मात्र त्यासाठी नगरपंचायतीकडून कोणताच पाठपुरावा झाला नसल्याने गेल्या पाच-सहा वर्षापासून हे प्रयत्नही फोल ठरले आहेत.
मलप्रभा नदीघाटाच्या दुसऱ्या टप्प्यातील घाट बांधकाम योजनेत अंत्यविधी शेड बांधण्याचाही प्रस्ताव होता. पण माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या निधनानंतर मलप्रभा नदीघाटाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावाचा कुणाकडूनही पाठपुरावा न झाल्याने ती योजना रखडली आहे. रेमाणी यांच्यानंतर कोणत्याच लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकाकडून दुसऱ्या टप्प्यातील घाट आणि स्मशानभूमी उभारणीसाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पूर्वापार असलेल्या स्मशानभूमीच्या ठिकाणी शेड आणि शवदाहिनी उभारलेली नाही. तालुका तसेच शहराचा वाढलेला विस्तार पाहता सुसज्ज अशी स्मशानभूमी आवश्यक आहे.
नदीतील रक्षाविसर्जनास निर्बंध घालणे गरजेचे
बेळगावसह आसपासच्या गावातील नागरिक रक्षाविसर्जनासाठी मलप्रभा नदीला प्राधान्य देतात. नोव्हेंबरनंतर जळगा आणि खानापूर बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येते. त्यावेळी बाहेरुन येणारे नागरिक खानापूर बंधाऱ्याच्या वरील बाजूस रक्षाविसर्जन करतात. त्यामुळे हे पाणी दूषित होते. अडवलेले पाणी शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे रक्षाविसर्जनासाठी बंधाऱ्याच्या पलीकडील बाजूस नव्याने मोठा कुंड उभारावा, आणि त्यात रक्षाविसर्जनाची सोय करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. बंधाऱ्याच्या वरील बाजूस रक्षाविसर्जनास पूर्णपणे निर्बंध घालण्यात यावा, यासाठी नगरपंचायतीने आतापासूनच नियोजन करावे.