हिरेकोडी येथील टीआय कारखाना बंद न करण्याची निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथे टीआय कारखाना असून, गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला असून, त्यांची उपजीविका चालत आहे. मात्र काही नागरिक आरोप करून हा कारखाना बंद करण्याची मागणी करत असून, त्यांची वर्तवणूक चुकीची आहे. हा कारखान बंद पडला तर अनेकांच्या लोकांच्या रोजंदारीवर गदा येणार आहे. त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना बंद न करण्याची मागणी भेंडवाड (ता. रायबाग) दलित संघटना,कारखाना कर्मचाऱ्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या कारखान्याद्वारे अनेकांना रोजगार मिळत आहे. तेथील कर्मचाऱ्यांना व पशुपक्षांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. तसेच कारखान्यातून कोणताही विषारी वायू व कचरा उत्सर्जित होत नसून, जनतेला आवाजाचा त्रासही होत नाही. कारखाना आवारात पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. यातून कर्मचारी आपली तहान भागवतात. याचा त्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र काही नागरिकांकडून कारखान्यातून दूषित पाणी येत असून दुर्गंधी व कर्कश आवाजाने परिसरातील वातावरण बिघडल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत.
100 कर्मचारी कार्यरत
येथे 100 कर्मचारी काम करत असून 500 शेतकरी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. जर कारखाना बंद पडला तर त्यांच्या उपजीविकेचा आधार बंद होईल. त्यामुळे हा कारखाना बंद न करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.