मुलीचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाखाची मागणी
तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी : भटकळ पोलिसांची कारवाई
कारवार : 20 लाख रुपये द्या अन्यथा मुलीचे खासगी फोटो व्हायरल करू, अशी व्यापाऱ्याला धमकी देणाऱ्या तिघांना भटकळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे मोहम्मद फारीस अब्दुल मुतलब कोडी (रा. अब्दुहुरेका कॉलनी, भटकळ), मोहम्मद अर्षद मोहम्मद जुबेर बरी (रा. मुसानगर, भटकळ) आणि अमीन मसुदखान (रा. हालाडी, कुदापूर, जिल्हा उडुपी) अशी आहेत. अमीन हा अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, भटकळ नगरातील भट्टेगाव येथील किडवाई रस्त्यावरील निवासी विद्यार्थी अन्वरसाब (वय 57) दुकानामध्ये असताना 16 तारखेला रात्री अज्ञाताकडून फोन येतो आणि अन्वरसाब यांच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली जाते. तातडीने 20 लाख देण्यात आले नाही तर मुलीचे खासगी फोटो व्हायरल करून व्यापाऱ्याची मानहानी केली जाईल, अशी पुढे धमकी दिली जाते.
पुढे 18 आणि 19 ऑगस्ट रोजी पुन्हा व्यापाऱ्याच्या पत्नीला अज्ञाताकडून फोन केला जातो आणि 20 लाख रुपये देणे शक्य नसेल तर 15 लाख रुपये द्या अशी मागणी केली जाते. अज्ञाताकडून देण्यात आलेल्या धमकीमुळे व्यापारी भयभीत होतो आणि झालेला प्रकार पोलिसांच्या कानावर घालतो. व्यापाऱ्याने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर भटकळचे डीवायएसपी महेश एम. के. यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञातांचा शोध घेण्यासाठी भटकळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीवाकर पी. एम. आणि उपनिरीक्षक नवीन एस. नाईक यांच्या नेतृत्वाखाली खास शोध पथकाची नेमणूक केली जाते. पुढे या पथकाकडून कोडी, बॅरी आणि मसुदखान या तिघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या यशस्वी कारवाईत दिनेश नायक, विनायक पाटील, नागराज मोगेर, महंतेश हिरेमठ, काशीनाथ कोटगुणशी, लोकेश कत्ती, महेश अमगोत, राघवेंद्र गौड, जगदीश नाईक आणि जिल्हा पोलीस तांत्रिक विभागाचे कर्मचारी बबन आणि उदय सहभागी झाले होते.