बेळगाव-बेंगळूर विमानफेरी रद्द न करण्याची मागणी
चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे निवेदन
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर इंडिगो विमानसेवा स्थगित करू नये, अशी मागणी चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्र्यांकडे केली आहे. यासंबंधी त्यांना एक निवेदनही पाठविण्यात आले आहे. 27 ऑक्टोबरपासून इंडिगोने बेळगाव-बेंगळूर विमानसेवा थांबवत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. खरे तर या विमानाला प्रवाशांची गर्दी आहे. त्यामुळे सेवा थांबविण्याची गरज नाही. या विमानामुळे एका दिवसात बेंगळूरला जाऊन आपली कामे आटोपून परत बेळगावला येणे शक्य होते.
विमानसेवा रद्द करण्याच्या घोषणेने बेळगावकरांमध्ये नाराजी वाढली आहे. बेळगावहून रोज सकाळी बेंगळूरला जाऊन तेथून आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास करणे शक्य होत होते. गेल्या दोन वर्षांपासून रोज 85 टक्के प्रवासी या विमानातून प्रवास करीत होते. दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होते. यासाठी मंत्री, आमदार, विधान परिषद सदस्य, अधिकाऱ्यांना बेळगावला येण्यासाठी व येथून बेंगळूरला जाण्यासाठी हे विमान अनुकूल होते. विद्यार्थी, चेंबर ऑफ कॉमर्स व उद्योजकांचीही विमानसेवा रद्द होऊ नये, अशी मागणी आहे. त्यामुळे ही सेवा रद्द करू नये, अशी मागणी प्रियांका जारकीहोळी यांनी केंद्रीयमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे. इंडिगोचे विमान पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.