बेळगावात अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी दिल्लीत मागणी
बेळगाव : बेळगावात सिंथेटिक अॅस्ट्रोटर्फ मैदानाची आवश्यकता असून सदर मैदान कॅम्प, बेळगाव येथील जीएलआर एसवाय क्र. 129 येथे विकसित करावे, अशी मागणी बेळगाव जिल्हा हॉकी संघटना व हॉकी बेळगावच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली मुक्कामी विविध खासदार, मंत्री आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सिंथेटिक अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय खेळ राज्यमंत्री रक्षाताई खडसे तसेच अन्य संबंधित खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. माजी मुख्यमंत्री व बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय खेळ मंत्री मनसुख मांडवीय यांना अॅस्ट्रोटर्फ मैदानाला निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या शिष्टमंडळाने केंद्रीय योजना खेळ खात्याचे अतिरिक्त सचिव अधीर रंजन राव, हर्षित जैन आदींच्याही भेटी घेतल्या. या वेळी बेळगाव हॉकीचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, सदस्य सागर पाटील आदींचा उपरोक्त शिष्टमंडळात समावेश होता.