मळणीच्या ताडपत्रींना मागणी
सुगी हंगामाला प्रारंभ : शेतकऱ्यांची लगबग
बेळगाव : परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर बळीराजा शेतीकामात मग्न झाला आहे. सुगी हंगामातील भात कापणी आणि इतर पिकांची काढणी सुरू झाली आहे. त्याबरोबर तुरळक प्रमाणात मळण्यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे बाजारात मळणीसाठी लागणारी ताडपत्री दाखल झाली आहे. या ताडपत्रीला शेतकऱ्यांकडून मागणी वाढू लागली आहे. अलिकडे खळ्यातील मळण्या नामशेष झाल्या आहेत. या जागी आता ताडपत्री व आधुनिक यंत्राणी जागा घेतली आहे. अलिकडच्या काही वर्षात सर्रास प्लास्टिक ताडपत्रीवरच मळण्या केल्या जात आहेत. त्यामुळे सुगी हंगामाला प्रारंभ झाला की ताडपत्र्यांना मागणी वाढू लागली आहे. येत्या काळात सुगी हंगामाला जोर येणार आहे.
दरम्यान ताडपत्री खरेदीची लगबग पहावयास मिळणार आहे. ताडपत्रींच्या किमती आकार आणि जाडीनुसार 500 ते 1500 रुपयापर्यंत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेसह जुना पी. बी. रोड आणि इतर ठिकाणी ताडपत्र्यांची विक्री होऊ लागली आहे. बेळगाव तालुक्यात सर्वाधिक भात शेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे सुगी हंगामात भाताची मळणी करताना ताडपत्री गरजेची आहे. यंदा परतीचा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने भात पिकांना फटका बसला आहे. शिवाय सुगी हंगाम काहीसा लांबणीवर पडला आहे. आता परतीच्या पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकरी सुगी हंगामाकडे वळले आहेत. बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन आदीच्या काढणीबरोबर भात कापणीलाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मळणीच्या कामासाठी ताडपत्रीची मागणी वाढू लागली आहे.