For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपनिरीक्षक महांतेश वाल्मिकी यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी

10:55 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
उपनिरीक्षक महांतेश वाल्मिकी यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी
Advertisement

कारवार : कारवार तालुक्यातील सदाशिवगड (चिताकुळा) ग्राम पंचायतीचे सदस्य दिलीप ज्ञानेश्वर गजीनकर यांना मारहाण केल्याप्रकरणी सदाशिवगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महांतेश वाल्मिकी यांना सेवेतून निलंबित करुन त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांच्याकडे सदाशिवगड ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे. अनंतचतुदर्शी दिवशी सदाशिवगड येथील बाजारपेठेतील श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्यावेळी ग्राम पंचायत सदस्य दिलीप गजीनकर आणि सदाशिवगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महांतेश वाल्मिकी यांच्या दरम्यान क्षुल्लक कारणापोटी वाद निर्माण झाला होता.

Advertisement

त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री गजीनकर यांना ताब्यात घेऊन मारहाण केली होती. मारहाणीमुळे गजीनकर यांच्या हाता-पायांना दुखापत झाली आहे. गजीनकर यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ सदाशिवगडवासिय रस्त्यावर उतरले होते. मारहाण प्रकरणामुळे सदाशिवगड येथे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.गुरुवारी सदाशिवगड ग्राम पंचायतीच्या कांही सदस्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून सदाशिवगड येथील सार्वजनिक गणरायांची विसर्जन मिरवणूक शांत वातावरणात पार पाडली जात आहे. तथापि, यावर्षी सदाशिवगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महांतेश वाल्मिकी यांनी अनावश्यकपणे विसर्जन मिरवणुकीच्यावेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला.

मिरवणुकीच्यावेळी क्षुल्लक कारणापोटी गजीनकर आणि महांतेश वाल्मिकी यांच्या दरम्यान वाद झाला. पुढे पोलिसांनी गजीनकर यांना गाठले आणि मारहाण केली. एवढ्यावर समाधान न झाल्याने पोलिसांनी गजीनकर यांच्यावर प्रकरण दाखल केले आहे. एखाद्या ग्राम पंचायत सदस्याला झालेली मारहाण अन्य सदस्य खपवून घेणार नाहीत, असे स्पष्ट करुन पुढे म्हटले आहे की, सदाशिवगड श्री विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. या घटनेचा तीव्र शद्बात निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेला पीएसआय सर्वस्वी जबाबदार असून त्यांना सेवेतून निलंबीत करुन अन्यत्र बदली करण्यात आली नाही तर सदाशिवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांकडून उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी सदाशिवगड ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुरज देसाई, सदस्य अशोक राणे, नितीन बांदेकर, स्वाती देसाई यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.