भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
वक्फविरुद्धच्या आंदोलनात दोन गट : एकीकडे ‘जनजागृती अभियान’ तर दुसरीकडे ‘आमची जमीन-आमचा हक्क’ दौरा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य भाजपमधील गटबाजीचे राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाला विरोध करणाऱ्या पक्षातील एका गटाने राज्यातील वक्फ मालमत्तेच्या वादावरून ‘जनजागृती अभियान’ हाती घेण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे विजयेंद्र यांनी राज्य भाजपचे पत्रक जारी करून वक्फ विवादासंबंधी ‘आमची जमीन-आमचा हक्क’ या नावाने जिल्हा दौरा करून अहवाल सादर करण्यासाठी तीन पथके नेमली आहेत. विशेष म्हणजे विरोधी गटातील नेत्यांनाही समाविष्ट केले आहे. त्यामुळे राज्य भाजपमधील दुफळीविषयी हायकमांड कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्य भाजपचे नेतृत्त्व स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच दरम्यान, त्यांच्या नेतृत्त्वाला विरोध करणाऱ्या गटातील आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री अरविंद लिंबावळी, रमेश जारकीहोळी यांनी शुक्रवारी माजी आमदार कुमार बंगारप्पा यांच्या बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन 25 नोव्हेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत वक्फविरुद्ध जनजागृती अभियान सुरू करण्याची घोषणा केली. हे अभियान बिदरमध्ये सुरू होणार आहे. बिदर, कलबुर्गी, विजापूर, यादगिरी, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या अभियानानंतर जनतेची मते जेपीसीकडे (वक्फ सुधारणा विधेयकासंबंधी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे) सादर करण्यात येतील, असेही सांगितले.
जनजागृती अभियानाला भाजप प्रदेशाध्यक्षांची संमती आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार यत्नाळ यांनी त्यांचे मौनच संमती असल्यासारखे आहे, असे सांगितले. वक्फविरुद्धच्या जनजागृती अभियानाला हायकमांडची संमती मिळविली का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, येथे हायकमांडकडून संमती मिळविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अलीकडेच मी विजापूरमध्ये धरणे आंदोलन केले तेव्हा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, व्ही. सोमण्णा यांनी पठिंबा दिला होता. त्यावेळीच अभियानाला आमच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होते. कर्नाटकात 6 लाख एकर वक्फ मालमत्ता करण्यास राज्य सरकार सरसावले आहे. 2,700 एकर जागा कब्रस्तानसाठी देण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे, अशी टीका त्यांनी केली.
वक्फने नोटीस बजावल्यामुळे शेतकरी, मठांवर अन्याय होत आहे. सर्वकाही न्यायालयामार्फतच निर्णय व्हावा, अशी आमची मागणी आहे. केवळ नोटिसा मागे घेऊन चालणार नाही वक्फ बोर्ड रद्द झाले पाहिजे. हीच बाब समोर ठेवून अभियान सुरू करत आहे. असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा, रमेश जारकीहोळी उपस्थित होते.
पक्षाकडून तीन पथके सत्यशोधन करणार
राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि मठांच्या अनेक जमिनींवरीर उताऱ्यात वक्फ मालमत्ता अशी नेंद आढळली आहे. याविषयी सत्यता जाणून घेऊन अहवाल तयार करण्यासाठी राज्य भाजपने ‘आमची जमीन-आमचा हक्क’ या घोषवाक्याखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता तीन पथके नियुक्त केली असून ते विविध जिल्ह्यांना भेट देऊन विस्तृत अहवाल तयार करणार आहे. यासंबंधीचे पत्रक शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आले. त्यामुळे विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाला विरोध करणाऱ्या गटाकडून होणाऱ्या अभियानाला भाजप हायकमांड स्थगिती देईल का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाखालील पहिल्या पथकात प्रल्हाद जोशी, जगदीश शेट्टर, भगवंत खुबा, डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण, मुरुगेश निराणी, बी. श्रीरामुलू, रमेश जारकीहोळी, इराण्णा कडाडी, हालप्पा आचार, सुनील वल्यापूरे व वकील एम. जी. जिरली यांचा समावेश आहे. या पथकावर संचालक म्हणून पी. राजीव तर संचालक म्हणून अरुण शहापूर, हरिश पुंजा, डॉ. शैलेंद्र बेलदाळे म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक बिदर, कलबुर्गी, यादगिरी, रायचूर, कोप्पळ, गदग, विजापूर व बागलकोट या जिल्ह्यांना भेट देणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरे पथक नेमण्यात आले आहे. या टीममध्ये बसवराज बोम्माई, शोभा करंदलाजे, बसनगौडा पाटील यत्नाळ, राजूगौडा, एम. पी. रेणुकाचार्य, एन. महेश, दो•नगौडा पाटील, भारती शेट्टी, डॉ. बी. सी. नवीनकुमार, वसंतकुमार यांचा समावेश आहे. या पथकामध्य संचालक म्हणून प्रीतम गौडा तर संयोजक म्हणून विनय बिदरे, डी. एस. अरुण, लक्ष्मी अश्विनीगौडा यांना नियुक्त केले आहे. हे पथक चामराजनगर, म्हैसूर, मंड्या, हासन, कोडगू, उडुपी, चिक्कमंगळूर, शिमोगा, कारवार या जिल्ह्यांचा प्रवास करेल.
तिसऱ्या पथकाचे नेतृत्त्व विधान परिषदेचे विरोधी नेते चलवादी नारायणस्वामी यांच्याकडे आहे. सदानंदगौडा, व्ही. सोमण्णा, सी. टी. रवी, नलीनकुमार कटील, अरविंद लिंबावळी, एस. मुनीस्वामी, अरग ज्ञानेंद्र, बी. सी. पाटील. वाय. ए. नारायणस्वामी यांचा समावेश आहे. व्ही. सुनीलकुमार यांना संचालक म्हणून तर संयोजक म्हणून तिम्मेगौडा व अंबिका हुलीनायक यांची नेमणूक केली आहे. हे पथक बेंगळूर ग्रामीण, कोलार, रामनगर, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, मधुगिरी, चित्रदुर्ग, दावणगेले, हावेरी व धारवाड जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाशी कटिबद्ध!
वक्फविरुद्धच्या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र कोणता निर्णय घेतात, त्यावर आम्ही कटिबद्ध राहू. प्रदेशाध्यक्ष अधिकृतपणे जो निर्णय घेतात, त्यावर सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. भाजप शिस्तीचा पक्ष आहे. प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा आणि तालुका पातळीवर आंदोलन झाले आहे. त्यांचाच निर्णय अंतिम आहे.
- एम. पी. रेणुकाचार्य, आमदार