For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळीसाठी फराळाच्या साहित्याला मागणी

10:27 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिवाळीसाठी फराळाच्या साहित्याला मागणी
Advertisement

गृहिणींची लगबग : पोहे, चिवडा, बेसनला पसंती : साहित्य किमतीत वाढ

Advertisement

बेळगाव : अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात फराळाच्या पदार्थांची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे, मका पोहे, शेंगदाणे, चिरमुरे, साखर, मैदा, रवा, बेसन तसेच चकली, करंजी, शंकरपाळ्या आदी साहित्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे किराणा दुकानांबरोबरच पोहे, चिरमुरे दुकानांतून नागरिकांची वर्दळ वाढताना दिसत आहे. बाजारात फुटाणे डाळ 100 ते 120 रु. किलो, शेंगा 140 ते 150 रु. किलो, चिवडा पोहे 70 ते 75 रु., मका पोहे 60 रु., रवा 40 रु., मैदा 35 रु., आटा 40 रु., बेसन 90 रु., हरभरा डाळ 80 रु., साखर 44 रु., डालडा 140 रुपये किलो असा दर आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फराळाच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गृहिणींना फराळासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. दिवाळीत विशेषत: फराळाला पसंती दिली जाते. त्यामुळे फराळाची मागणी वाढली आहे. विशेषत: तयार लाडू, चकली, शंकरपाळी, करंजा, अनारसे आदींची मागणीही वाढू लागली आहे. शिवाय हे पदार्थ तयार करण्यासाठी मैदा, आटा, बेसन, रवा, साखर, गुळ, खाद्यतेल, डालडा, तूप आदी पदार्थांचीही खरेदी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारात गृहिणींची लगबग पाहावयास मिळत आहे. दिवाळी जवळ आल्याने खमंग फराळाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे विविध पोहे आणि इतर पदार्थांचा चिवडा करण्यासाठी पोह्यांची मागणी वाढू लागली आहे. त्याचबरोबर गुळ, शेंगा आणि साखरेचीही खरेदी होऊ लागली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना वाढत्या दराचा फटका बसू लागला आहे.

Advertisement

खाद्यतेलाच्या मागणीत वाढ

खाद्य तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ आणि इतर पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल खरेदी होऊ लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे खाद्यतेलाच्या किमती स्थिर आहेत. खाद्यतेलाचा 15 किलोचा डबा 1500 पासून 2 हजार रुपयांपर्यंत आहे. किरकोळ 160 पासून 200 रुपयांपर्यंत विकले जात आहे.

Advertisement
Tags :

.