अनुसूचित 101 समुदायांना आरक्षणाची मागणी
युव कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघटनेचे निवेदन
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातींमधील 101 समुदायांना आरक्षण देण्याची मागणी युव कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघटनेने केली आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमातींमधील 101 जातींना समान आरक्षण मिळाले नाही. गेल्या तीन दशकांपासून यासंबंधीची खंत वाटते. आरक्षणासाठी झालेल्या लढ्यात अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. आरक्षणासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, पंजाबसह वेगवेगळ्या राज्यात आंदोलने झाली. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक निकाल देऊन या वादावर पडदा टाकला आहे. आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी राज्य सरकारला अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बसवराज बोम्माई मुख्यमंत्री असताना झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वर्गीकरणाचा निर्णय घेऊन केंद्राकडे शिफारस करण्यात आली आहे. या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. अध्यक्ष प्रवीण मादर यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.