संगोळ्ळी रायण्णा रस्त्यावरील गतिरोधक पुन्हा बसविण्याची मागणी
बेळगाव : मुख्य कोर्टासमोरील संगोळ्ळी रायण्णा रोडवरील गतिरोधक पूर्णत: खराब झाले आहेत. यामुळे सिग्नल सुटल्यानंतर चन्नम्मा सर्कल येथून वेगाने वाहने आरटीओ सर्कलकडे जात आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला असून, वेगावर नियंत्रण येण्यासाठी गतिरोधक पुन्हा बसविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. संगोळ्ळी रायण्णा मार्गावरील वाहनांची गती कमी करण्यासाठी जिल्हा न्यायालयासमोर गतिरोधक घालण्यात आले होते. परंतु, वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे गतिरोधक आता पूर्णत: खराब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाहनांची गती वाढली आहे. न्यायालयातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भुयारी मार्ग असला तरी त्याचा तितकासा वापर केला जात नसल्याने रस्त्यावरूनच ये-जा केली जाते. वाहनांची गती पाहता या ठिकाणी अपघात होण्याची चिन्हे आहेत. गतिरोधक असल्यास वेग कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पुन्हा गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.