पुणे-गोवा व्हाया बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी
डॉ. किरण ठाकुर यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट : उद्योग-आर्थिक क्षेत्राला हातभार लागणार
बेळगाव : प्रवाशांच्या सोयीसाठी व व्यापार-उदिम वाढविण्याच्यादृष्टीने पुणे-गोवा व्हाया बेळगाव या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नुकतीच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव, तसेच गोवा वंदे भारत व इतर रेल्वे प्रकल्पांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढत आहे. महामार्ग सहापदरी होत असल्यामुळे अजून काही दिवस महामार्गाच्या कामाला लागणार आहेत. यामुळे मुंबई-पुण्यातील उद्योजक, व्यापारी यांना कोल्हापूर, बेळगाव, गोव्याला पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने या मार्गावर जलदगतीने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यास उद्योग व व्यापाराला चालना मिळणार आहे.
बेळगाव ते मिरज या दरम्यानचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर पुणे-मिरज दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आहे. गोवा राज्य महसुलाच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याने पुणे-गोवा व्हाया मिरज, बेळगाव अशी रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल. तसेच मिरज, कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथील उद्योग व आर्थिक क्षेत्राला हातभार लागणार असल्याने रेल्वेमंत्र्यांनी या प्रस्तावाचा विचार करावा, अशी मागणी किरण ठाकुर यांनी केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी निवेदन स्वीकारून बेळगाव-गोवा येथील रेल्वेप्रश्नांबाबत किरण ठाकुर यांच्याशी चर्चा केली. बेळगावमध्ये अनेक नवीन प्रकल्प होऊ घातले आहेत. ते लवकरच पूर्ण करण्यासोबतच बेळगावला नवीन रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. तसेच लांबपल्ल्याचे मार्ग सुरू करण्यास विलंब होतो, असे ते म्हणाले. यावर पुणे-बेळगाव वंदे भारत रेल्वेसेवा सुरू करावी. त्यामुळे व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. तसेच बेळगावसह कोल्हापूर व हुबळीच्या प्रवाशांची सोय होईल, याकडे डॉ. किरण ठाकुर यांनी लक्ष वेधले.
रेल्वे मंत्रालय उत्तम काम करत असून रेल्वेओव्हरब्रिज मात्र लवकरात लवकर व्हावेत, असे डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले. यावेळी आपण दीडशे रेल्वेस्टेशन सुधारण्याचे काम हाती घेतले असून त्यांचे विद्युतीकरण व आधुनिकीकरण सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याप्रसंगी आयएनएसचे अध्यक्ष राकेश शर्मा, पुढारीचे संचालक योगेश बाळासाहेब जाधव, दै. हिंदुस्थानचे विलास मराठे, दिल्लीचे सचिन जैन, इलेक्ट्रॉनिक मॅगझीनचे प्रदीपकुमार, दिल्लीचे राजेश जैन, पंजाब केसरीचे चोप्रा व अन्य मान्यवर उपस्थित होते.