पत्रकारांना सुविधा पुरविण्याची मागणी
बेळगाव : राज्यभरात काम करणारे पत्रकार व संपादक सामाजिक जबाबदारीने कार्यरत असतात. सार्वजनिकांच्यावतीने समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज ते उचलून धरतात. मात्र, सेवा बजावत असतानाही त्यांना कोणत्याही सुविधा, आरोग्य सुरक्षा नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. यासाठी राज्य सरकारने पत्रकार व संपादकांच्या हितासाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात. त्याचबरोबर त्यांच्यासाठी आरोग्य विमा योजनाही लागू करावी, अशी मागणी कार्यरत पत्रकार व संपादक फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली.
पत्रकारांसाठी राज्यस्तरीय आरोग्य विमा अमलात आणावी. सदर योजना खासगी व सरकारी रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांना मोफत उपचार मिळावेत, या पद्धतीने कार्यान्वित करावी. पत्रकारांसाठी निवृत्ती सुरक्षा निधी स्थापन करण्यासाठी पावले उचलावीत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कायदेशीर मदत, गृहनिर्माण सुविधा व शिक्षणासाठी मदत देण्यासाठी विशेष योजना जारी करावी. अपघातात किंवा कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी. पत्रकार हक्क संरक्षण कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली.