निज्जरचे मृत्यूप्रमाणपत्र देण्याची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडामध्ये ठार करण्यात आलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांचे मृत्यूप्रमाणपत्र अद्यापही त्या देशाने भारताला दिलेले नाही, असा आरोप भारताने केला आहे. त्याची हत्या झाल्यानंतर त्वरित भारताने या मृत्यूप्रमाणपत्राची मागणी केली होती. अनेक महिन्यांच्या नंतरही ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. उलट भारताला हे मृत्यूप्रमाणपत्र कशासाठी हवे आहे, अशी उद्दाम विचारणा कॅनडाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती विदेश विभागाने दिली.
गेल्या वर्षी जूनमध्ये कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया भागात सरे येथे हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत भारत सरकारचा हात असून भारत सरकारच्या हस्तकांनी सुपारी देऊन ही हत्या घडविल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारत सरकारचा उल्लेख करुन असा आरोप जाहीररित्या केला होता. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
उच्चायोग अधिकाऱ्यांची हकालपट्टी
कॅनडाच्या सर्व आरोपांचा भारताने स्पष्ट शब्दांमध्ये इन्कार केला आहे. काही दिवसांपूर्वी भारताने कॅनडाच्या सहा उच्चायोग अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. कॅनडानेही असेच पाऊल उचलले होते. कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी भारताच्या विरोधात आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याची कबुलीही दिली होती. तरीही कॅनडाच्या सरकारने आजही भारत सरकारविरोधात आरोपसत्र मागे घेतलेले नाही. कॅनडाचा सत्ताधारी पक्ष खलिस्तानवाद्यांना राजकीय कारणासाठी खूष ठेवत आहे, असा आरोप भारताच्या उच्चायोग प्रमुखांनी नुकताच केला आहे.