आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली गुळाला मागणी
कोल्हापूर :
जिल्ह्यातील गुळ व्यवसायाला घरघर लागली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत गुळाला मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने परदेशात गुळाच्या सेवनामध्ये वाढ झाली आहे. विशेषता आखाती देशांमधून जास्त मागणी आहे. गेल्या पाच वर्षातील निर्यातीची आकडेवारी पाहता महाराष्ट्रातून होणाऱ्या गुळ निर्यातीत सुमारे तीन पट तर देशातून होणाऱ्या निर्यातीत पाच पट वाढ झाली आहे.
कोल्हापुरी साज, कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा अशा काही वस्तू खाद्यपदार्थ हि कोल्हापूरीची ओळख आहे. यापैकी एक म्हणजे कोल्हापुरी गुळ हि देखिल कोल्हापुरची ओळख आहे. शेतीसमृद्ध असलेल्या या जिल्ह्यात एकेकाळी 1100 हून अधिक गुऱ्हाळ घरे होती. मात्र कालांतराने जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत गेली. गुऱ्हाळ घरांहून अधिक दर कारखान्यांकडून मिळू लागल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यांना ऊस घालण्याकडे कल वाढला. यामधून जिल्ह्यातील गुळ व्यवसायासमोर अनेक संकटे निर्माण होत गेली.
कुशल कर्मचाऱ्यांची वाणवा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणार कमी दर, गुळव्यांची कमतरता अशी अनेक आव्हाने गुळ व्यवसायासमोर उभी राहिल्याने जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांची संख्या कमी-कमी होत गेली. सध्या जिल्ह्यात केवळ दहा टक्क्यांहूनही कमी गुळ व्यवसाय सुरु आहे. मागील हंगामात जिल्ह्यात कशीबशी 87 गुऱ्हाळांची धुराडी पेटली ही जिल्ह्यातील गुळ व्यवसायाची वस्तुस्थिती आहे. तसेच कोल्हापूर बाजार समितीत नियमित निघाणारे गुळ सैदे यंदा अनियमित स्वरुपात सुरु राहिले. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरे सुरु राहतील की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील गुळ व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला तरी आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र गुळाच्या मागणीत चांगलीच वाढ होतानाचे चित्र आहे. सन 2022-23च्या हंगामात राज्यातून 3.63 लाख मे.टन आणि देशातुन 7.62 लाख मे.टन इतक्या गुळाची निर्यात करण्यात आली. गुळ निर्यातीची मागणी पाहता जिल्ह्यातील गुळ उत्पादकांनीही व्यवसायातील बदल स्विकारून ते आत्मसात केले पाहिजे. तसेच जीआय मानंकनसाठी नोंदणी करुन गूळ निर्यातीची प्रक्रीया जाणून घेणे आवश्यक आहे, असे केल्यासच जिल्ह्यातील गुळ व्यवसायाला पुन्हा उभारी मिळणार आहे. मात्र जीआय मानांकन नोदंणीसाठी बाजर समितीसह गुळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उदासिनता आहे.
मागील 5 वर्षात राज्यातून झालेल्या गुळ निर्यातीची आकडेवारी अशी :
वर्ष निर्यात (लाख मे.टन) आर्थिक उलाढाला (कोटीत)
2019-20 1.82 841
2020-21 2.62 1153
2021-22 2.52 1342
2022-23 3.63 2128
2023-24 1.19 1572
मागील 5 वर्षात देशातून झालेल्या गुळ निर्यातीची आकडेवारी अशी :
वर्ष निर्यात (लाख मे.टन) आर्थिक उलाढाला (कोटीत)
2019-20 3.41 1633
2020-21 6.32 2660
2021-22 5.52 2798
2022-23 7.62 4330
2023-24 5.17 3571