फुलबाग गल्लीच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : फुलबाग गल्लीच्या काँक्रीटीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम करून जवळपास 2 महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील रस्त्याच्या कामाकडे अद्यापही दुर्लक्ष करण्यात आले असल्याने पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जुना रस्ता खोदण्यात आला असल्याने पाणी तुंबल्याने या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
फुलबाग गल्ली रस्त्याची दयनिय अवस्था बनली होती. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा किंवा रस्ता काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांतून केली जात होती. त्यानुसार 2 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेकडून रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यावरील जुने डांबर खोदण्यात आले असून मुख्य रस्त्यापासून फूटभर रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्याची खोली वाढल्याने पावसाचे पाणी तुंबून दलदल निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून तातडीने रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.