बेळगावच्या गणेशमूर्तींना आंध्रप्रदेश, महाराष्ट्र-गोव्यातून मागणी
यावर्षी परराज्यांतील अडीचशेहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरू : मूर्तिकलेवर बेळगावच्या मूर्तिकारांचा हातखंडा
बेळगाव : बेळगावचा गणेशोत्सव म्हणजे भव्यदिव्य आणि सुबक गणेशमूर्ती असे समीकरण आहे. बेळगावच्या मूर्तिकारांकडून रेखीव मूर्ती घडविल्या जात असल्याने केवळ बेळगावच नाही तर आता आंध्रप्रदेश, दक्षिण कर्नाटक, गोवा तसेच महाराष्ट्रातील गणेशभक्तांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळेच यावर्षी बेळगावमध्ये इतर राज्यांमधील तब्बल अडीचशेहून अधिक गणेशमूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
आपल्या मंडळाचा बाप्पा इतरांपेक्षा वेगळा असावा, यासाठी मंडळांकडून वेगवेगळ्या थीम राबविल्या जातात. काही मंडळे देखावे सादर करतात तर काही जण गणेशमूर्तींमध्ये वेगळेपणा दाखवत असतात. बेळगावमधील मूर्ती कलेला मोठी परंपरा आहे. मूर्ती कलेतील निष्णात म्हणून ओळख असलेले जे. जे. पाटील यांनी बेळगावच्या मूर्ती इतर राज्यांपर्यंत नेल्या. त्यांच्यासोबत सध्याच्या घडीला बेळगावमधील मूर्तिकार परराज्यांतील सुबक मूर्ती घडवत आहेत.
मूर्तीतील हुबेहूबपणा बेळगावच्या मूर्तिकारांची जमेची बाजू असल्याने मुंबईपाठोपाठ बेळगावला सर्वाधिक गणेशमूर्तींची मागणी असते. बेळगावमध्ये रस्ते तसेच वीजवाहिन्यांमुळे एका मर्यादेपर्यंत गणेशमूर्तींची उंची ठेवावी लागते. अन्यथा मुंबईपेक्षाही मोठ्या गणेशमूर्ती घडविण्याची ताकद बेळगावच्या मूर्तिकारांमध्ये आहे. दरवर्षी गोवा, महाराष्ट्र व दक्षिण कर्नाटकातील मंडळांची गणेशमूर्तीसाठी मागणी असायची. यावर्षी थेट आंध्रप्रदेशमधून देखील तीन ते चार मंडळे गणेशमूर्ती तयार करून घेण्यासाठी बेळगावमध्ये आली आहेत.
इतर राज्यांमध्येही आकर्षण
बेळगावमध्ये सुरेख गणेशमूर्तींचे आकर्षण इतर राज्यांमधील गणेशभक्तांनाही आहे. त्यामुळे यावर्षी बेंगळूर येथील 70 सार्वजनिक गणेशमूर्ती तयार करून पाठविण्यात आल्या. आता बागलकोट, दावणगेरी, हुबळी यासह मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
विनायक मनोहर पाटील (मूर्तिकार, येडियुराप्पा मार्ग)
मंडळांकडून नवनवीन मूर्तींची मागणी
शेजारील राज्यांमधील गणेश मंडळांकडून नवनवीन मूर्तींची मागणी होत आहे. यावर्षी हुपरी, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी यासह आंध्रप्रदेश व कर्नाटकाच्या विविध भागांतून गणेशमूर्तींसाठी ऑर्डर दिली आहे. अंदाजे 60 गणेशमूर्ती इतर राज्यांतील तयार करण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात रंगकामाला सुरुवात केली जाणार आहे.
एम. जी. पाटील (मूर्तिकार, मुतगा)
सुबक मूर्तिकामाची ओळख
बेळगावच्या मूर्तिकारांनी आपल्या सुबक मूर्तिकामाची ओळख करून दिल्याने महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशमधूनही मंडळांचा ओढा आहे. यावर्षी आंध्रप्रदेश, महाराष्ट्र तसेच चिकोडी, सदलगा, अळणावर, बागेवाडी येथील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.
विनायक जे. पाटील (मूर्तिकार, अनगोळ)


