बेळगाव-बागलकोट महामार्गावर बाजूपट्ट्यांवर मातीचा भराव टाकण्याची मागणी
सांबरा : बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी बाजूपट्ट्या खचल्या असल्याने अपघातांना खुले आमंत्रण मिळत आहे. यासाठी संबंधित खात्याने बाजूपट्ट्यांवर मातीचा भराव टाकावा, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे. दरवर्षी बेळगाव ते सांबरापर्यंतच्या रस्त्याची संबंधित खात्याकडून देखभाल केली जाते. येथे असलेल्या विमानतळामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची जास्त वर्दळ असते. मात्र अलीकडच्या काळामध्ये रस्त्याच्या देखभालीकडे संबंधित खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बाजूपट्ट्या खचल्या असून रात्रीच्या वेळी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्ताही उखडून गेला आहे. मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदी ठिकाणी बाजूपट्ट्या मोठ्या प्रमाणावर खचल्या आहेत. तरी संबंधित खात्याने रस्त्याची पाहणी करून त्वरित बाजूपट्ट्यावर मातीचा भराव टाकावा, अशी मागणी वाहनचलकांतून होत आहे.