असोगा रस्त्यावरील भुयारी मार्गाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी
खानापूर : खानापूर, असोगा मार्गावरील रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गाची उभारणी गेल्या काही वर्षापासून रखडली आहे. यासाठी मन्सापूर, भोसगाळी, कुटिन्होनगर ग्रामस्थ खानापूर रेल्वे स्टेशनजवळ (भुयारी) रेल्वे पुलाची मागणी करीत आहेत. त्यात रेल्वे गेट जवळील रस्ता अत्यंत अऊंद व धोकादायक आहे. भुयारी रेल्वे पुलासाठी निधी मंजूर होऊनही तांत्रिक अडचणीमुळे पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी वकील चेतन मणेरीकर यांच्या नेतृत्वाखाली हुबळी येथील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकर भुयारी रेल्वेपूल निर्मितीचे कार्य सुरू करण्याची मागणी करण्यात आली. डेप्युटी चीफ इंजिनिअर के. मोहनराव यांनी निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून येत्या महिन्याभरात भुयारी रेल्वे पुलाचे काम सुरू करण्याची ग्वाही दिली. यावेळी रामलिंग देव ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष सोमाण्णा मोरे, विजय सुरेश होळणकर, विलास मिसाळ, संदीप पाटील, भिकाजी मादार आदी उपस्थित होते. यापूर्वी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भुयारी रेल्वे पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप निविदा प्रक्रियाचे कामच सुरू झाले नसल्याने हा भुयारी मार्ग होणार की नाही, याचीच शंका व्यक्त होत आहे.