रवी धोत्रे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी
सफाई कर्मचारी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन : एससीएसटी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
बेळगाव : महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 28 मधील पीके क्वॉर्टर्स येथे मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगरसेवक रवी धोत्रे यांच्या बेजबाबदारपणामुळे येथील रहिवाशांना सरकारच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. मागासवर्गीयांसाठी राखीव असणारा निधी मंगलकार्यालयासाठी नगरसेवकांनी वळविला आहे. रवी धोत्रे यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन सफाई कर्मचारी काऊलू समितीतर्फे मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना देण्यात आले. एससीएसटी समाजासाठी राखीव असणारा निधी नगरसेवक रवी धोत्रे यांनी आपल्या मंगलकार्यालयासाठी वळविला आहे. त्यामुळे या राखीव निधीमध्ये गैरकारभार झाला आहे. निधीचा दुरुपयोग करून घेण्यात आला आहे. यामुळे मागासवर्गीय समाजाच्या वसतीमध्ये विकासकामे रखडली आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पथदीप, रस्ते, भुयारी गटारी आदी सुविधा नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विकास कामांअभावी येथील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छतागृहे आहेत मात्र त्यांना दरवाजा नसल्याने गैरसोय झाली आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून येथील रहिवाशांकडून पाठपुरावा करण्यात येत असला तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागासवर्गीय वसतींमध्ये विकासकामे राबविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे. पीके क्वॉर्टर्स रहिवाशांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, राष्ट्रीय संविधान दिन, भीमा कोरेगाव दिन अशा कार्यक्रमांना या वॉर्डाचे लोकप्रतिनिधी म्हणून रवी धोत्रे यांना आमंत्रित करण्यात आले तरी ते हजर होत नाहीत. त्यामुळे अशा नगरसेवकांची काय गरज आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील बेरोजगार तरुणांना एससीएसटी योजनेंतर्गत ऑटोरिक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी राखीव असणारा निधी खर्च करून दुरुपयोग करण्यात आला आहे. दलित विरोधी असणाऱ्या नगरसेवक रवी धोत्रे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.