कपिलेश्वर कॉलनीतील ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी
बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी ते जुना धारवाड रोडपर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेज पाइपलाइन घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम संपून बरेच महिने लोटले तरी त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे कसरतीचे ठरत आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वी तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. श्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये विविध विकासकामे केली. तरी अजूनही काही कामे अर्धवट आहेत. रस्ते झाल्यानंतर पुन्हा खोदाई करून पाइपलाइन घालण्यात येत आहे. यामुळे पुन्हा रस्ते खराब होत आहेत. कपिलेश्वर कॉलनी ते जुना धारवाड रोडपर्यंत रस्त्यावर ड्रेनेज पाइपलाइन घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर पाइप घालून चरी बुजविण्यात आल्या. त्यानंतर खडी पसरविण्यात आली आहे. मात्र, डांबरीकरण करण्यात आले नाही. याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड जात आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.