अगसगा, चलवेनट्टी संपर्क रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी
बेकिनकेरे ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना निवेदन : लक्ष्मी यात्रेपूर्वी रस्ता करण्याची आवश्यकता
वार्ताहर/उचगाव
बेकिनकेरे रस्ता अगसगा, चलवेनटी या गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दोन भागांमध्ये ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भातील निवेदन बेकिनकेरे ग्रामस्थ व लक्ष्मी देवस्कीपंच कमिटीतर्फे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देऊन लक्ष्मी यात्रेपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली आहे.
उचगाव परिसरातील अनेक नागरिकांची कामे ही कडोली, अगसगा, चलवेनट्टी अशा भागामध्ये सातत्याने असतात अनेकवेळा नागरिक, प्रवासी या भागातून सातत्याने याच मार्गे रहदारी करतात. नागरिकांना या दोन्ही भागात जाण्यासाठी उचगाव बॉक्साईटमार्गे कडोली व परत येताना उचगावमार्गे ये-जा करावी लागते. सदर संपर्क रस्ता व्यवस्थित झाला तर जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतर वाचू शकते. यासाठी हा रस्ता होने महत्त्वाचे आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात बेकिनकेरे गावची लक्ष्मीयात्रा असल्याने या लक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने याच मार्गाने रहदारी होणार आहे. यासाठी सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण होण्याची आवश्यकता आहे, अशा आशयाचे निवेदन सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आहे. यावेळी बेकिनकेरे लक्ष्मी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत सावंत, नारायण भडांगे, मलापा गावडे, गजानन मोरे, अरुण गावडे, नारायण भोगण, बळवंत भोगण, भावकू सावंत, सोमनाथ भडांगे, नागेद्र बिरजे, मोहन पवार, गोपाळ हुबळीकर पीडीओ, मारुती कांबळे, राजू मोरे तसेच बेकिनकेरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.