मनमानीपणे भूभाडे वसूल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी
बेळगाव : शहर व उपनगरात रस्त्याच्या कडेला बसून दररोज हजारो बैठे विक्रेते व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. मात्र अशा बैठ्या विक्रेत्याकडून बेकायदेशीरित्या मनमानी पद्धतीने भूभाडे वसूल केले जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बैठे विक्रेते समितीच्या सदस्यांकडून महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांना देण्यात आले.
सोमवार दि. 24 रोजी महापालिकेत बैठे विक्रेते समितीच्या सदस्यांनी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली यांची भेट घेऊन निवेदन दिले. रस्त्याकडेला बसून व्यापार करणाऱ्या बैठ्या विक्रेत्यांकडून दहा रुपये भूभाडे वसूल करण्याचा नियम आहे. मात्र 20 रुपये आकारले जात आहेत. फास्टफूड आणि तत्सम व्यापाऱ्याकडून 50 रुपयांऐवजी 100 रुपये आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत संबंधितांना विरोध करून विचारणा केली असता बैठ्या विक्रेत्यांना धमकावण्यात येत आहे. अशा प्रकारे मनमानी पद्धतीने भूभाडे वसूल केले जात असले तरी महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. हा प्रकार न थांबल्यास हिवाळी अधिवेशनात आंदोलन करून मुख्यमंत्री आणि मंत्र्याचे लक्ष वेधले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
भूभाडे वसुलीचा ठेका रद्द करू
निवेदनाचा स्वीकार करून महापौर मंगेश पवार व सत्ताधारी गट नेते हणमंत कोंगाली म्हणाले, भूभाडे वसुली ठेकेदार व त्यांच्या सहकाऱ्यांकडून बैठ्या विक्रेत्यांना त्रास दिल्यास ते सहन केले जाणार नाही. गरीब व्यापाऱ्यांना त्रास देऊ नये, याबाबत ठेकेदाराला कळविले जाईल, जर त्यांनी कोणती सुधारणा केली नाही तर भूभाडे वसुलीचा ठेका रद्द करण्यासंदर्भात विचार करू, असे आश्वासन दिले. यावेळी बैठे विक्रेते, व्यापार समितीचे सदस्य इमामहुसेन नदाफ, प्रसाद रामचंद्र कवळेकर, संगीता खोत, विजय चव्हाण, चंद्रिका देसूरकर, श्रीपाद होळकर, शोभा नायक, महमद अली, भगवान यांच्यासह बैठे विक्रेते उपस्थित होते.