Sangli News : शासनाचे लाभ जनतेच्या दारी पोहोचविणे हीच लोकसेवा : आ. डॉ. विश्वजित कदम
कडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवड्याची सांगता
कडेगाव : "सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर मिळणे हीच खरी लोकसेवा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचत आहेत. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असून प्रशासन व जनता यांच्यातील विश्वास छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानमधून दृढ होत आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा सांगता समारंभकडेगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, कडेगावचे तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते नागरिकांना थेट हक्काचे दाखले आणि योजना लाभ देण्यात आले. पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांना सनद वाटप, दिव्यांग बांधवांना संजय गांधी योजना लाभ, भूमिहीनांना पट्टे, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले अशा बहुआयामी सुविधांचे दाखले नागरिकांच्या हातात सुपूर्द केले.
यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव तालुक्यातील जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने केलेले प्रयत्न आदर्शवत आहेत. तहसीलदार, प्रांताधिकारी आणि संपूर्ण महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत ही जनतेसाठी दिलासा देणारी आहे.
शासन दरबारी धावपळ न करता गावातच हक्काचा लाभ मिळणे हे लोकाभिमुख प्रशासनाचे खरे उदाहरण आहे, असे गौरवोद्वार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले.यावेळी नायब तहसीलदार महेश अनारसे, सागर कुलकर्णी, वैष्णवी पुजारी आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक : आ. डॉ. विश्वजित कदम
कडेगाव तालुक्यातील हजारो नागरिकांना शासनाचे प्रत्यक्ष लाभ थेट गावात पोहोचविणारा हा सेवा पंधरवडा उपक्रम लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत आहे, असे सांगून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले.