दिल्लीचा बेंगळूरवर एका धावेने थरारक विजय
सामनावीर जेमिमा रॉड्रिग्जचे अर्धशतक : श्रेयांकाचे 4 बळी, रिचा घोषचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर बेंगळूर) केवळ एका धावेने पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सतर्फे सामनावीर रॉड्रिग्जने अर्धशतक झळकाविले. तर आरसीबीच्या रिचा घोषचे अर्धशतक वाया गेले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 181 धावा जमविल्या. त्यानंतर आरसीबीने 20 षटकात 7 बाद 180 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये जेमीमा रॉड्रिग्जने 36 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 58, कॅप्सेने 32 चेंडूत 8 चौकारांसह 48, कर्णधार लॅनिंगने 26 चेंडूत 5 चौकारांसह 29, शेफाली वर्माने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23, कॅपने 6 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. जोनासेन एका धावेवर बाद झाली. कर्णधार लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी सलामीच्या गड्यासाठी 28 चेंडूत 54 धावांची भागिदारी केली. शोभनाने वर्माला झेलबाद केले. त्यांनतर श्रेयांका पाटीलने लॅनंगला पायचीत केले. दिल्लीची ही सलामीची जोडी बाद झाल्यानंतर रॉड्रिग्ज आणि कॅप्से यांनी संघाच्या धावसंख्येला आकार देताना तिसऱ्या गड्यासाठी 10.1 षटकात 97 धावांची भागिदारी केली. श्रेयांका पाटीलने रॉड्रिग्जचा तर त्यानंतर कॅप्सेचा त्रिफळा उडविला. श्रेयांकाने जोनासेनला यष्टीरक्षक घोषकरवी यष्टीचीत केले. दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये 3 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. दिल्ली संघाला अवांतराच्या रुपात 7 धावा मिळाल्या. आरसीबीतर्फे श्रेयांका पाटीलने 26 धावांत 4 तर शोभनाने 29 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या डावाला भक्कम सुरुवात झाली नाही. कर्णधार मानधना दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पायचीत झाली. तिने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. एलीस पेरी आणि मॉलिन्यू यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागिदारी केली. एकेरी धाव घेण्याच्या नादात पेरी धावचीत झाली. तिने 32 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 49 धावा जमविल्या. मॉलिन्यू रे•ाrच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 30 चेंडूत 5 चौकारांसह 33 धावा जमविल्या. सोफी डिव्हाइनने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा जमविताना रिचा घोषसमवेत चौथ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. वेरहॅम पांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 6 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिशा कसाट आपले खाते उघडण्यापूर्वीच धावचीत झाली. या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिचा घोष शेफाली वर्माच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धावचीत झाली. घोषने 29 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावा जमविल्या पण तिचे अर्धशतक वाया गेले. 20 षटकात आरसीबीने 7 बाद 180 धावा जमविल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीच्या डावात 6 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे कॅप, कॅप्से, शिखा पांडे, रे•ाr यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आरसीबीचे 3 फलंदाज धावचीत झाले. आरसीबीने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 42 धावा जमविताना 1 गडी गमाविला. आरसीबीचे पहिले अर्धशतक 44 चेंडूत, शतक 80 चेंडूत तर दीडशतक 107 चेंडूत फलकावर लागले.
आज सोमवारी गुजरात जायंट्स व यूपी वॉरियर्स महिलांची लढत होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 5 बाद 181 (लॅनिंग 29, शेफाली वर्मा 23, जेमीमा रॉड्रिग्ज 58, अॅलिस कॅप्से 48, कॅप 12, अवांतर 9, श्रेयांका पाटील 4-26, शोभना 1-29), आरसीबी 20 षटकात 7 बाद 180 ( मानधना 5, मॉलिन्यू 33, एलिस पेरी 49, डिव्हाइन 26, रिचा घोष 51, वेरहॅम 12, अवांतर 4, कॅप, कॅप्से, पांडे, रे•ाr प्रत्येकी 1 बळी).