कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीचा लखनौवर दणदणीत विजय

06:58 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर मुकेश कुमारचे 33 धावांत 4 बळी, केएल राहुल, अभिषेक पोरेलची अर्धशतके : पराभवामुळे लखनौची वाट बिकट

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

येथील एकाना स्टेडियमवर झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने लखनौचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. प्रारंभी, मॅरक्रमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने  6 बाद 159 धावा जमवल्या. यानंतर दिल्लीने अभिषेक पोरेल व केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजयी लक्ष्य 17.5 षटकांतच पूर्ण केले. दरम्यान, दिल्लीचा हा आठ सामन्यातील सहावा विजय ठरला आहे. या विजयासह दिल्लीचा संघ प्ले ऑफ शर्यतीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पराभवामुळे लखनौची वाट मात्र बिकट झाली आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौला मॅरक्रम व मिचेल मार्श यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 10 षटकांत 87 धावांची सलामी दिली. ज्या प्रकारे हे दोघे फलंदाजी करत होते, ते पाहता लखनौचा संघ मोठी धावसंख्या उभी करेल असे वाटत होते. मॅरक्रमला चमीराने बाद करत ही जोडी फोडली. त्याने सर्वाधिक 33 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारासह 52 धावांची खेळी साकारली. मिचेल मार्श 36 चेंडूत 45 धावा करुन माघारी परतला. ही जोडी बाद झाल्यानंतर निकोलस पूरन व अब्दुल समाद यांनी निराशा केली. या डावात ऋषभ पंत सातवा क्रमाकांवर फलंदाजीला आला, पण त्याला भोपळाही फोडता आला नाही. आयुष बडोनीने मात्र 6 चौकारासह नाबाद 36 धावांची खेळी केल्यामुळे लखनौला दीडशेचा टप्पा गाठता आला. मिलर 14 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करताना 33 धावांत 4 विकेट्स घेतल्या.

केएल, पोरेलची अर्धशतके

लखनौने विजयासाठी दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर करुण नायर स्वस्तात माघारी परतला. त्याने 9 चेंडूत 15 धावा फटकावल्या. यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या जोडीने लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान, पोरेलने अर्धशतकी खेळी साकारताना 36 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 51 धावांचे योगदान दिले. त्याला मॅरक्रमने बाद केले. पोरेल बाद झाल्यानंतर केएल राहुलने कर्णधार अक्षर पटेलसोबत 56 धावांची भागीदारी करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. राहुलने आपल्या आक्रमक शैलीत फटकेबाजी करताना 42 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारासह नाबाद 57 धावांची खेळी केली. अक्षर पटेल 20 चेंडूत 34 धावा करत नाबाद राहिला. दिल्लीने विजयी लक्ष्य अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपर जायंटस 20 षटकांत 6 बाद 159 (मॅरक्रम 52, मिचेल मार्श 45, पूरन 9, डेव्हिड मिलर नाबाद 14, आयुष बडोनी नाबाद 36, मुकेश कुमार 33 धावांत 4 बळी, मिचेल स्टार्क व चमीरा एकेक बळी)

दिल्ली कॅपिटल्स 17.5 षटकांत 2 बाद 161 (अभिषेक पोरेल 51, करुण नायर 15, केएल राहुल 42 चेंडूत नाबाद 57, अक्षर पटेल नाबाद 34, मॅरक्रम 2 बळी).

केएल राहुलची डबल धमाल

लखनौविरुद्ध लढतीत केएल राहुलने 42 चेंडूत 57 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. चालू हंगामातील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पाही पार केले. राहुलने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 7 डावात 323 धावा केल्या आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article