दिल्लीने हरलेला सामना जिंकला
सामनावीर आशुतोष शर्माची 31 चेंडूत 66 धावांची तुफानी खेळी : लखनौचा शेवटच्या षटकात पराभव
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
सामनावीर आशुतोष शर्माच्या (31 चेंडूत नाबाद 66) धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सवर रोमांचक विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत लखनौने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष्य दिल्लीने 19.3 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्ली पराभवाच्या छायेत वावरत होती. पण आशुतोषने तुफानी खेळी करीत दिल्लीसाठी विजय खेचून आणला.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात शार्दुल ठाकुरने सलामीवीर मॅकगर्कला माघारी पाठवले. अभिषेक पोरेलला भोपळाही फोडता आला नाही तर समीर रिझवी 4 धावा काढून बाद झाला. कर्णधार अक्षर पटेलही 11 चेंडूत जलद 22 धावा काढून बाद झाल्यामुळे दिल्लीची 4 बाद 50 अशी स्थिती झाली होती. डु प्लेसिसने 29 धावांचे योगदान दिले.
आशुतोष शर्माची आक्रमक खेळी अन् दिल्लीचा विजय
या कठीण स्थितीत ट्रिस्टन स्टब्ज व आशुतोष शर्मा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 48 धावांची भागीदारी साकारली. स्टब्जने 22 चेंडूत 34 धावा फटकावल्या. त्याला सिद्धार्थने तंबूचा रस्ता दाखवला. स्टब्ज बाद झाल्यानंतर आशुतोष शर्माने लखनौच्या गोलंदाजांची धुलाई करताना संघाला शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 31 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारासह नाबाद 66 धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याला विपराज निगमने 15 चेंडूत 39 धावा करत मोलाची साथ दिली. यामुळे दिल्लीने 19.3 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात उद्दिष्ट पूर्ण केले. लखनौकडून शार्दुल ठाकुर, सिद्धार्थ, बिश्नोई व राठीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीकडून सलामीला उतरलेल्या एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी आक्रमक सुरुवात केली. विशेषत: मार्शने जोरदार फटके खेळले. पण मार्करमला पहिला सामना खेळणाऱ्या विपराज निगमने मिचेल स्टार्कच्या हातून 15 धावांवर बाद केले. पण त्यानंतर मार्श आणि पूरन यांचे वादळ घोंघावले. या दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांना लय मिळू दिली नाही. आक्रमक फटकेबाजी करत 21 चेंडूतच मार्शने अर्धशतक झळकावले. त्यानंतरही दोघे आक्रमक खेळत होते. अखेर 12 व्या षटकात मार्शला मुकेश कुमारने ट्रिस्टन स्टब्सच्या हातून झेलबाद केले. मार्शने 36 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश राहिला. मार्श आणि पूरनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 42 चेंडूत 87 धावांची भागीदारी झाली.

पूरनचीही फटकेबाजी
मार्श बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे, पूरनने मात्र दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना 30 चेंडूत 6 चौकार व 7 षटकारासह सर्वाधिक 75 धावांची वादळी खेळी साकारली. त्याला मिचेल स्टार्कने 15 व्या षटकात बोल्ड केले. यानंतर डेव्हिड मिलरने 19 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केल्यामुळे लखनौला 20 षटकांत 9 बाद 209 धावापर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 तर कुलदीप यादवने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 8 बाद 209 (मिचेल मार्श 72, निकोलस पूरन 75, डेव्हिड मिलर नाबाद 27, मिचेल स्टार्क 3 बळी तर कुलदीप यादव 2 बळी)
दिल्ली कॅपिटल्स 19.3 षटकांत 9 बाद 211 (डु प्लेसिस 29, अक्षर पटेल 22, ट्रिस्टन स्टब्ज 34, विपराज निगम 39, आशुतोष शर्मा 31 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारासह नाबाद 66, शार्दुल ठाकुर, सिद्धार्थ, रवि बिश्नोई व राठी प्रत्येकी दोन बळी).