दिल्लीचा सामना आज गुजरातशी
रिषभ पंतच्या नेतृत्वाची कसोटी
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आज बुधवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार असून यावेळी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागेल तसेच संघर्ष करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या गोलंदाजांकडून अधिक सुधारित कामगिरीची अपेक्षा राहील. पंतसाठी ही आदर्श घरवापसी राहिलेली नाही. कारण सलग दोन विजयानंतर दिल्लीला शनिवारी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविऊद्ध 67 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे दिल्ली तीन विजय आणि पाच पराभवांसह आठव्या स्थानावर घसरला आहे. जर त्यांना प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्यांना आणखी घसरण परवडणारे नाही आणि हे त्यांना चांगले ठाऊक आहे. सनरायझर्सविरुद्ध पंतने काही निर्णय घेताना चुका केल्या. नाणेफेकीपासून त्याची सुरुवात होते. त्याने अऊण जेटली स्टेडियमवर दवाचा घटक विचारात घेतला नाही आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरे षटक ललित यादवकडे सोपवण्याचा पंतचा निर्णयही वादग्रस्त होता. वैयक्तिक आघाडीवर पंतने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना 35 चेंडूंत 44 धावा केल्या. परंतु पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर फारसे यशस्वी झाले नाहीत. तरूण जेक फ्रेझर-मॅकगर्कने केवळ 18 चेंडूंत 65 धावा करून दिल्लीचे अव्हान जिवंत ठेवले. अभिषेक पोरेल (22 चेंडूंत 42) यानेही सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांना सनरायझर्सने झोडपून काढले आणि त्यांनी आता आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला सातत्याच्या अभावाने ग्रासले आहे. वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्टजे या मोसमात पूर्ण जोमात नाही आणि अनुभवी इशांत शर्माला पाठीच्या दुखण्यामुळे मागील सामना गमवावा लागल्यानंतर तो आता परत येईल अशी दिल्लीला आशा असेल. कुलदीप यादव हा मोसमातील आतापर्यंतचा त्यांचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिला आहे. त्याने पाच सामन्यांत 10 बळी घेतले आहेत. पण सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात तो चमकू शकला नाही. नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने देखील या मोसमात तितकाच सातत्याचा अभाव दाखविलेला आहे. पण मागील सामन्यात पंजाब किंग्जवर तीन गडी राखून मिळवलेल्या विजयामुळे ते चार विजय आणि तितक्याच पराभवांसह सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. त्यांना चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी गिलवर असेल. साई सुदर्शन, डेव्हिड मिलर आणि अजमतुल्ला ओमरझाई यांनीही आपल्या क्षमतनेनुरुप कामगिरी करून दाखविणे आवश्यक आहे, तर राहुल तेवतिया डावाच्या शेवटच्या टप्प्यात आपली आक्रमक भूमिका कायम राखण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजीत अनुभवी मोहित शर्मा, नूर अहमद आणि रशिद खानवर अपेक्षांचा भार असेल.
संघ
दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धूल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्र, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, रिचर्डसन, रसिख दार, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, ललित यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुदर्शन, शाहऊख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशिद खान, विजय शंकर, राहुल तेवातिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बी. आर., मानव सुतार.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.