दिल्ली भेट... उत्सुकता कायम!
मुख्यमंत्र्यांची अमित शहांबरोबर दीर्घ राजकीय चर्चा : अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले गोव्याचे विविध विषय
पणजी : सोमवारी येथून नवी दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत मंगळवारी दिवसभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्यातील विविध विषयांवर चर्चा केली. त्याचबरोबर गोव्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा केल्याने आता पुढे काय होणार याबाबतची उत्सुकता ताणली आहे. मुख्यमंत्री आज एका महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होऊन सायंकाळी गोव्यात परतणार आहेत. गेले कित्येक महिने राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक दिल्ली भेटीवेळी मंत्रीमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण येते, तसे या खेपेसही उत्सुकता ताणली गेली आहे.
अन् प्यादी हलू लागली
“पुढील पंधरा दिवसात या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागेल,” असे वक्तव्य सभापती रमेश तवडकर यांनी अलीकडेच केल्यानंतर गोव्याच्या राजकीय पटलावर प्यादी हलू लागली. त्यातच गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी देखील मंत्रिमंडळ फेररचनेबाबतची शक्मयता नाकारलेली नाही.
अमित शहांशी राजकीय चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारी रात्री उशिरा नवी दिल्लीला रवाना झाले आणि मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. त्यात खास करून राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा केली, मात्र त्याबाबत काहीही वाच्यता केली नाही.
चर्चा समाधानकारक
डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रिपदावर आरुढ झाल्यास काल मंगळवारी सहा वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले. गोव्यातील अनेक विषयांवर डॉ. सावंत यांनी चर्चा केली. त्याबाबत आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे कळण्यास मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत मौन पाळले आहे.
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची भेट
आपल्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या कन्येच्या विवाह स्वागत समारंभात सहभागी झाले. त्यावेळी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यातील अनेकांबरोबर चर्चा केली. आज सकाळी सागरमाला संदर्भात एक महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होतील. त्यानंतर ते सायंकाळी गोव्यात येतील.
रमेश तवडकर, दिगंबर कामत, मायकल लोबोंची वर्णी?
विधानसभा अधिवेशन पुढील आठवड्यात होईल. अधिवेशनात मुख्यमंत्री गोवा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्लीत जाण्याची शक्मयता आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल. यामध्ये एकतर सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्याने शपथ ग्रहण होईल किंवा दोन-तीन मंत्र्यांना राजीनामा देण्याची सूचना केली जाईल. या नव्याने पुनर्रचना होत असलेल्या मंत्रिमंडळात दिगंबर कामत यांची वर्णी लागणार आहे. सभापती रमेश तवडकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. मायकल लोबो यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत चर्चा चालू आहे.