स्मार्ट सिटी-2 च्या कामांचा दिल्लीच्या पथकाकडून आढावा
मनपा-स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती : पथक तीन दिवस करणार बेळगावात वास्तव्य
बेळगाव : स्मार्ट सिटी-2 योजनेंतर्गत बेळगाव शहराची निवड झाली असून विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत कोणकोणती कामे हाती घेतली जाणार आहेत, त्याची माहिती घेण्यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांची पथके बेळगावला येत आहेत. सोमवारी दिल्ली येथील एक पथक बेळगावात दाखल झाले असून त्यांच्याकडून मनपा व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. सोमवारी सकाळी दिल्ली येथून आलेले पथक बेळगावात दाखल झाल्यानंतर त्यांचे मनपा व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर अशोकनगर येथील बुडा कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी सदर निधीतून कोणकोणती विकासकामे राबविली जाणार आहेत, याची माहिती घेऊन आढावा घेण्यात आला. तसेच 15 व्या वित्त आयोग योजनेतील अनुदानातूनदेखील कामे हाती घेण्यात यावीत, असे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर सदर पथकाने नेहरुनगर येथील इंदिरा कॅन्टीनला भेट दिली. बायोगॅस प्लांटमधून पुरविण्यात आलेल्या गॅसवर तयार करण्यात आलेला चहा यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला. सदर पथक चार दिवस बेळगावात वास्तव्यास असणार आहे.
मंगळवार दि. 1 रोजी तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पाला, त्याचबरोबर सदाशिवनगर येथील वाहनांच्या सर्व्हिस सेंटरला भेट दिली जाणार आहे. तसेच सदाशिवनगर येथील सुका कचरा कलेक्शन सेंटर आणि सदाशिवनगर येथील इंदिरा कॅन्टीनला भेट देण्यात येणार आहे. बुधवार दि. 2 रोजी खासबाग वैद्यकीय कचरा प्रकल्प आणि वृद्धाश्रमाला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर विश्वेश्वरय्यानगर येथील कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरमध्ये बैठक होईल. गुरुवार दि. 3 रोजी अशोकनगर येथील बुडा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महापालिका आयुक्त शुभा बी., स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका सईदा आफ्रीन बानु बळ्ळारी, महापालिकेचे साहाय्यक पर्यावरण अभियंता हणुमंत कलादगी, प्रवीणकुमार, आदीलखान पठाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.