दिल्ली विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद
सात जणांना अटक : 13 कोचिंग सेंटर्सना टाळे : दोघा अभियंत्यांवर बडतर्फ-निलंबन कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघर दुर्घटनेप्रकरणी दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) सोमवारी कारवाई केली. एका कनिष्ठ अभियंत्याला बडतर्फ तर सहायक अभियंत्याला निलंबित करण्यात आले. जुन्या राजेंद्र नगरमध्ये असलेल्या या कोचिंग सेंटरच्या तळघरात शनिवारी पावसाच्या पाण्यात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी 5 जणांना अटक केल्याने आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सोमवारी दिल्लीतील 13 कोचिंग सेंटर्सही सील करण्यात आली.
कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांचा बेसमेंटमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता त्याचे पडसाद सर्वत्रच उमटू लागले आहेत. भाजपने आप मुख्यालयाजवळ निदर्शने केली. एमसीडीमध्ये आपचे बहुमत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. महापौरही आपचेच आहेत. एमसीडीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. कामगारांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वॉटर पॅननचा वापर केला. तसेच आप कार्यकर्त्यांनी एलजी सचिवालयाबाहेर भाजप आणि एमसीडी आयुक्तांविरोधात निदर्शने केली. एमसीडी कमिशनरची नियुक्ती गृह मंत्रालयाकडून केली जाते. आयुक्तांच्या निष्काळजीपणामुळे पाणी साचून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. याशिवाय कोचिंगचे विद्यार्थी सलग दुसऱ्या दिवशी एमसीडी आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी व आंदोलन करत आहेत. याचदरम्यान, एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये अपघाताच्या एक महिना आधी म्हणजेच 26 जून रोजी एमसीडीकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत दोन स्मरणपत्रेही देण्यात आली. असे असतानाही एमसीडीने कारवाई केली नसल्याचे आढळून आले आहे.
वेगाने कार चालवणाऱ्या व्यक्तीलाही अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोचिंग क्लाससमोर वेगाने कार चालवणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. त्याची एसयूव्ही कारही जप्त करण्यात आली आहे. गाडी वेगाने चालवल्यामुळे पाण्याचा दाब वाढला आणि बेसमेंटचे गेट तुटल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर तळघरात बांधलेल्या लायब्ररीत पाणी भरले आणि विद्यार्थी बुडू लागले.
दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
कोचिंग सेंटर दुर्घटनेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवासी मंचने दाखल केलेल्या या याचिकेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून अपघात झाल्यास योग्य ती भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने जनहित याचिकामध्ये दिल्ली सरकार, एमसीडी आणि राऊ आयएएस कोचिंग यांना पक्षकार बनवले आहे. यामध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय इतर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचेही सांगण्यात आले आहे.
संसदेतही गोंधळ
दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या अपघाताची सोमवारी संसदेतही चर्चा झाली. याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांनी आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भाजपने आम आदमी पार्टीला या घटनेला जबाबदार धरले आहे. भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी या घटनेसाठी दिल्ली सरकारला जबाबदार धरले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी याप्रकरणी भाष्य करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग संस्थांवर सरकार बुलडोझर कारवाई करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला.