For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीत कायम

06:57 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
Advertisement

रोमांचक सामन्यात मुंबई 10 धावांनी पराभूत : सामनावीर मॅकगर्कची 27 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 10 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, मॅकगर्क, स्टब्ज व शाय होपच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 257 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 247 धावाच करु शकला. दरम्यान, दिल्लीचा हा दहा सामन्यातील पाचवा विजय असून या विजयासह त्यांनी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. दुसरीकडे पराभवामुळे मुंबईची वाटचाल मात्र बिकट झाली आहे. 27 चेंडूत 84 धावांची खेळी साकारणाऱ्या मॅकगर्कला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये मुंबईला 6 षटकात 65 धावा करता आल्या, पण तीन फलंदाजाना गमावलं होते. रोहित शर्माला 8 धावा काढता आल्या. ईशान किशनने 14 चेंडूत 20 धावांची खेळी केली तर सूर्यकुमार यादवने 13 चेंडूमध्ये 26 धावा जोडल्या. सलामीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर तिलक वर्माने हार्दिकला सोबत घेत चौथ्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. हार्दिकने 24 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 46 धावा केल्या, पण चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यानंतर मधल्या फळीतील नेहाल वढेरालाही मोठी खेळी करता आली नाही.

तिलक वर्माची एकाकी झुंज

दुसरीकडे तिलक वर्माने मात्र एकाकी झुंज देताना सर्वाधिक 32 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह 63 धावा केल्या. तिलक वर्माने महत्वाच्या दोन भागीदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या 71 धावांची भागिदारी केली. तर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी 29 चेंडूत 70 धावा जोडल्या. डेविड 37 धावा काढून आऊट झाला तर तिलक वर्मा हाणामारीच्या प्रयत्नात रनआऊट झाला. तिलक बाद झाल्यानंतर मुंबईला 20 षटकांत 9 बाद 247 धावापर्यंत मजल मारता आली. मोहम्मद नबीने 4 चेंडूमध्ये सात धावांची खेळी केली. पियुष चावलाने 10 धावा केल्या तर ल्युक वूड 9 धावांवर नाबाद राहिला.

मॅकगर्कचा धडाका, स्टब्ज, होपचीही फटकेबाजी

तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीची सुरुवात दमदार झाली. जेक मॅकगर्कने अवघ्या 15 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने पॉवरप्लेमध्ये तब्बल 92 धावांचा पाऊस पाडला. मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी 7.3 षटकांत 114 धावांची भागीदारी केली. पियुष चावलाने मॅकगर्क याला बाद करत मुंबईला दिलासा दिला. मॅकगर्कने अवघ्या 27 चेंडूमध्ये 84 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 6 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. याशिवाय, अभिषेक पोरेलने 27 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर शाय होपने 17 चेंडूत 5 षटकारासह 41 धावा ठोकल्या. होपला वूडने तंबूचा रस्ता दाखवला. होप बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्जने शेवटच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी केली. त्याने 25 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्याला ऋषभ पंतने 29 धावा करत चांगली साथ दिली. अक्षर पटेल 11 धावांवर नाबाद राहिला. यामुळे दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 257 धावांचा डोंगर उभा केला.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 4 बाद 257 (मॅकगर्क 27 चेंडूत 84, अभिषेक पोरेल 36, शाय होप 17 चेंडूत 41, ऋषभ पंत 29, ट्रिस्टन स्टब्ज 25 चेंडूत नाबाद 48, अक्षर पटेल नाबाद 11, बुमराहृ चावला, मोहम्मद नबी व ल्युक वूड प्रत्येकी एक बळी).

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 247 (इशान किशन 20, रोहित शर्मा 8, सुर्यकुमार यादव 26, तिलक वर्मा 32 चेंडूत 63, हार्दिक पंड्या 46, टीम डेविड 37, पियुष चावला 10, मुकेश कुमार व रसिख सलाम प्रत्येकी 3 बळी, खलील अहमद 2 बळी).

 युवा फलंदाज मॅकगर्कचा विक्रम

शनिवारी मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीचा युवा सलामीवीर मॅकगर्कने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे हे यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक असून त्याने दुसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक केले आहे. दिल्लीसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या आपल्याच विक्रमाशी फ्रेझर मॅकगर्कने बरोबरी केली आहे. यापूर्वी त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही 15 चेंडूत अर्धशतक केले होते. यापूर्वी, दिल्लीसाठी आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम ख्रिस मॉरिसच्या नावावर होता. त्याने 17 चेंडूत गुजरातविरुद्ध 2016 मध्ये अर्धशतक केलं होते. दरम्यान, हा विक्रम मॅकगर्कने दोनदा मोडला आहे.

Advertisement
Tags :

.