दिल्ली, गुजरात महिलांचे लक्ष्य सुधारीत फलंदाजीवर
वृत्तसंस्था /बेंगळूर
2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथे दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना खेळविला जाणार असून हे दोन्ही संघ सुधारीत फलंदाजीवर अधिक लक्ष्य केंद्रित करीत आहेत. या दोन्ही संघांना मंगळवारच्या सामन्यात विजयाची गरज आहे.

या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांना यापूर्वीच्या सामन्यात पाठोपाठ पराभव पत्करावे लागले आहेत. महिलांच्या प्रिमीयर लीग स्पर्धेच्या गेल्या दोन हंगामात गुजरात जायंट्स संघाला गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यावेळी गुजरात जायंट्सचा संघ तीन पैकी एक सामना जिंकून गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग दोन पराभवामुळे त्यांचे गुणतक्त्यातील स्थान घसरले असून आता हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाची या स्पर्धेत अद्याप समाधानकारक कामगिरी झालेली नाही. त्यांची फलंदाजी भक्कम नसल्याने त्यांना मंगळवारच्या सामन्यात फलंदाजीत सुधारणा करण्यावर अधिक लक्ष्य केंद्रित करावे लागेल. या संघातील सलामीची फलंदाज कर्णधार लॅनिंग, रॉड्रिग्ज तसेच शफाली वर्मा अधिक धावा जमविण्यासाठी झगडत आहेत.
गुजरात जायंट्सची कर्णधार गार्डनरने या स्पर्धेत आतापर्यंत तीन डावात 141 धावा जमविल्या असून ती सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाच्या फलंदाजीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. आता या संघातील फलंदाजांवर या त्रुटी कमी करण्यासाठी अधिक लक्ष्य केंद्रित करावे लागेल. डी. हेमलताला फलंदाजीत यापूर्वी बढती देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात जायंट्सला केवळ 120 धावांपर्यंत मजल मारता आली होती. गुजरात संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने गार्डनर, प्रिया मिश्रा, शबनम शकील यांच्यावर आहे. गुजरात संघाला या सामन्यात विजय मिळविण्यासाठी सांघिक कामगिरीची जरुरी आहे.
गुजरात संघ : गार्डनर (कर्णधार), भारती फुलमाली, वूलव्हर्ट, लिचफिल्ड, सिमरन शेख, गिब्सन, डी. हेमलता, डॉटीन, देवोल, सायली सतगेरी, तनुजा कंवर, बेथमुनी, के. गौतम, मनत काश्यप, मेघना सिंग, प्रकाशिका नाईक, प्रिका मिश्रा आणि शबनम शकील.
दिल्ली कॅपिटल्स: लॅनिंग (कर्णधार), रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह दिप्ती, कॅप्से, सदरर्लंड, अरुंधती रेड्डी , जोनासेन, कॅप, मिन्नु मणी, एन. चेरानी, निकी प्रसाद, राधा यादव, शिखा पांडे, नंदिनी काश्यप, तानिया भाटीया, सारा ब्राईस, तितास साधू
वेळ सायंकाळी 7.30 वाजता