दिल्ली-गुजरात कबड्डी लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/नोएडा
2024 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे गुजरात जायंट्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील चुरशीचा सामना अखेर 39-39 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. उभय संघातील रायडर्सनी आपल्या अचूक पकडीवर गुण वसुल केले. गुजरात जायंटस्च्या पार्तिक दाहीयाने 20 गुण नोंदविले. तर आशु मलिकने सुपर 10 गुणांची नोंद केली. दबंग दिल्ली संघाने सुरुवातीच्या पाच मिनिटांत जलद गुण वसुल करत गुजरात जायंटसवर आघाडी मिळविली होती. दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यात खेळू न शकणाऱ्या नवीनकुमारने या सामन्यात संधी मिळताच दर्जेदार खेळ केला. आशु मलिकच्या आक्रमक चढायांवर दबंग दिल्लीने गुजरात जायंट्सवर 9 गुणांची आघाडी मिळविली.
मात्र त्यानंतर गुजरात जायंटसचा खेळ अधिक आक्रमक आणि अचूक झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. मोहीतला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याने त्याच्या जागी पार्तिक दाहीयाला मैदानात उतरविण्यात आले. पार्तिकच्या पहिल्या चढाईवरच दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद झाले. अशिष मलिक आणि संदीप यांच्या चढायांमुळे गुजरात जायंटसला दिल्लीशी बरोबरी साधता आली. पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत गुजरात जायंटसने दबंग दिल्लीवर 20-17 अशा 3 गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात गुजरात जायंट्सचे दुसऱ्यांदा सर्व गडी बाद झाले. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात गुजरात संघाला पार्तिक दाहीलिया याने सुपर 10 गुण मिळविले. आशिष मलिकच्या शानदार चढाईमुळे दबंद दिल्लीला 1 गुणाची आघाडी मिळविता आली. पण शेवटच्या क्षणी गुजरात जायंटसने एक गुण हसुल करत हा सामना टाय’ (बरोबरी) राखला.