दिल्लीत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील वायू प्रदूषणाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता दिल्लीच्या सरकारी कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिल्लीच्या राज्य सरकारने हा आदेश बुधवारी काढला आहे. या आदेशामुळे दिल्लीत मार्गांवरील वाहनांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. कारण अनेक कर्मचारी स्वत:च्या स्वयंचलित वाहनांनी कार्यालयांना जातात. या वाहनांची मार्गांवरील संख्या कमी झाल्यास प्रदूषण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत सध्या प्रदूषणाचा निर्देशांक 426 च्या पातळीवर पोहचला आहे. त्यामुळे राज्य सरकारला हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करावी लागत आहे. याच उपाययोजनेचा भाग म्हणून 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
दिल्लीत पुढील काही दिवसांमध्ये इव्हन ऑड नियमही लागू केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इव्हन ऑड नियम याचा अर्थ असा आहे की ज्या वाहनांचे शेवटचे दोन कमांक सम असतील त्यांना विशिष्ट दिवशी मार्गांवर येता येईल. तसेच ज्या वाहनांचे शेवटचे दोन क्रमांक विषम असतील त्यांना हे दिवस वगळून ऊर्वरित दिवशी मार्गांवर येता येईल. सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला प्रदूषण त्वरित नियंत्रणात आणण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचीही माहिती देण्याचा आदेश दिला आहे.