दिल्ली मुख्यमंत्री आतिशी पंतप्रधान मोदींच्या भेटीला
राजकीय शिष्टाचार : पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच भेट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अतिशी मार्लेना यांनी सोमवारी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आतिशी यांची पंतप्रधानांशी झालेली ही भेट राजकीय शिष्टाचार होती. आतिशी यांनी 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासह त्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या सर्वात तऊण महिला आहेत.
उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती.
मुख्यमंत्री झाल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आम आदमी पार्टीला दिल्लीत पुन्हा सत्तेत आणण्याचे सर्वात मोठे आव्हान आतिशी यांच्यासमोर आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचे आव्हान मार्लेना यांच्यासमोर आहे.